Igatpuri | पहिल्याच पावसात अंगणवाडीला गळती; जुन्या, पडक्या इमारतीत भरली बालवाडी

0
24
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : इगतपुरी |  तालुक्यातील ग्रामपंचायत सोनोशी येथील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अंगणवाडी क्रमांक १ इमारतीचा पहिल्याच पावसात स्लॅब लिकेज झाला असून पहिल्याच पावसात अंगणवाडीत पाणी आल्याने अंगणवाडीतील लहान मुलांची बसण्याची मोठी गैरसोय झाली आहे. जिल्हा वार्षिक महिला बालविकास योजनेतून सन 2023 /24 मध्ये बांधण्यात आलेल्या दहा लक्ष निधीच्या या निकृष्ट दर्जाच्या अंगणवाडीबाबत गावातील तरुणांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला असून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, सोनोशी येथील अंगणवाडी इमारतीचे कामकाज महिला बालविकास योजनेतून करण्यात आले आहे. यासाठी दहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. शासन ग्रामीण भागातील आदिवासी भागातील जीवनमान उंचावे, त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, शारीरिक विकास व्हावा म्हणून महिलांच्या सामाजिक आर्थिक सशक्तीकरण तथा बालकांसाठी त्यांच्या विकासासाठी विविध योजना आखत असते. यासाठी उपाययोजना करत असते.

परंतु खरच या अद्ययावत शैक्षणिक आर्थिक सुखसुविधां ग्रामीण भागात पोहचतात का..? पोहचत असल्यास त्या दर्जायात्मक आहेत का..? याच प्रत्यक्ष उदाहरण समोर आलं आहे. दहा लाख रुपये खर्च करून नव्याने बांधकाम झालेल्या इमारतीच्या स्लॅबला तडे जाऊन स्लॅब लिकेजमुळे इमारतीत पाणी साचत असल्याने सोनोशी येथील अंगणवाडीतील बालकांची बसण्यासाठी व पोषण आहार वाटपासाठी मुलांची व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

Igatpuri | सीमंतिनी कोकाटे यांच्याकडून कातकरी वस्तीची पाहणी; प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन

Igatpuri | अर्ज देऊनही कार्यवाही नाही 

परिणामी जुन्या मोडकळीस आलेल्या पडक्या अंगणवाडीत बालवाडी भरविण्याची वेळ येथील कर्मचाऱ्यांवर आली आहे. सोनोशीतील अंगणवाडीचे बांधकाम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून यात अंगणवाडीच्या मुख्य दरवाजा व शौचालय दरवाजाचे कामात देखील संबंधित ठेकेदाराने कुचराई केली आहे. तसेच अंगणवाडी इमारतीचे कामकाज चालू असताना स्लॅब करतेवेळी अनेक कामे अपुरी ठेवली असतांना यासंदर्भात गावातील तरुणांनी संबंधित ठेकेदाराला पावसाळ्यात स्लॅब अंगणवाडी छत लिकेज होऊ नये म्हणून बांधकाम करते वेळी सूचना केल्या होत्या. यासंदर्भात सचिन धोंगडे यांनी इगतपुरी पंचायत समिती बांधकाम विभागातील अभियंत्यांना चौकशी करणेकामी लेखी अर्ज दिला होता. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

ठेकेदार व सरपंच यांची मनमानी  

सदर अंगणवाडी इमारतिचा स्लॅब काँक्रीट मिक्सर मशीनच्या सहाय्याने भरण्याऐवजी माणसांच्या साहाय्याने काँक्रीट तयार करून भरण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थ सचिन धोंगडे यांनी सांगितले आहे. याबाबतीत गावातील ग्रामस्थ तरुणांनी संबंधित ठेकेदार दळवी व सरपंच यांना या अपुर्‍या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी या ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करून अंगणवाडीचे काम मनमानी करत पूर्ण केले व काही काम हे अपुरेच ठेवले आहे. अंगणवाडीचे काम अजून पूर्ण झाले नाही. तरीही त्यांनी काम पूर्ण झाल्याचे फलकसुध्दा लावले असून, कामाची रक्कम उचलली आहे.

Igatpuri | ‘पाऊस आला अन् वीज गेली’; इगतपुरी भागातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठक

काम अपूर्ण असताना कामाची पूर्ण रक्कम कशी दिली जाते..?

काम अपूर्ण असताना कामाची पूर्ण रक्कम काम पूर्ण होण्याच्या अगोदरच कशी दिली जाते..? आज अंगणवाडीतील बालकांचा आसन व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला याला जबाबदार कोण.? टक्केवारीच्या हव्यासापोटी देशाचे उगवते भविष्य पावसाळ्यात जुन्या पडक्या अंगणवाडीत बसत आहे. याबाबत ग्रामस्थ गणपत पेढेकर, सचिन धोंगडे, तुषार पेढेकर, विनोद धोंगडे, भावेश धोंगडे, रघुनाथ गोडे आदी तरुणांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलांच्या जीवितास धोका असून, सदर कामाची प्रशासनाने पाहणी करावी व सदर अंगणवाडीचे काम करणार्‍या ठेकेदारावर कायदेशीर योग्य ती कारवाई करण्याची मागणी गावातील तरुणांनी केली आहे. लवकरच पत्रव्यवहाराद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी ठिकाणी चौकशी व कारवाई करण्यात येणार असल्याचे तरुण वर्गाने सूचित केले आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

“नवीन अंगणवाडी इमारत लिकेज संदर्भात मी वारंवार स्थानिक सरपंच, ग्रामसेवक यांना सूचित करून विनवणी केली. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही उपाययोजना झाली नसल्याने अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देण्यासाठी व बसण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.”
– मंदाबाई धोंगडे (अंगणवाडी सेविका)

“अंगणवाडी इमारत बांधकाम करतेवेळीच संबंधित ठेकेदार दळवी यांना गावातील तरुणांनी पावसाळ्यात स्लॅब लिकेज होऊ नये यासाठी वेळोवेळी विचारणा केली होती. परंतु जे व्हायला नको तेच आज भरपावसाळ्यात झाला आहे. स्लॅब लिकेजमुळे आमच्या आदिवासी मुलांची मोठी गैरसोय झाली आहे. यावर शासनाने तात्काळ उपाययोजना करावी. अन्यथा तरुणांच्या वतीने जिल्हाधिकारी, सीईओ यांना निवेदन देण्यात येईल.”
– रघुनाथ गोडे, (ग्रामस्थ सोनोशी)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here