सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विवाहाला अवघे सात महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून येथील इंदिरानगरमधील एका नवविवाहितेने आपले जीवन संपवले. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने तिने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. देवळा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयुर पवार (वय १९) (रा. इंदिरानगर, देवळा) हिचा सासरच्या मंडळींकडून पैशासाठी वारंवार छळ केला जात होता.
पती मयुर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांनी संगनमत करून अंबिकाला माहेरहून वीस हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती. ३१ मार्च २०२५ रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिल्याने ती शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे गेली आणि १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सखुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले.
Deola | देवळा बाजार समितीच्या आवारात स्वच्छता अभियान
प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलवण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार (वय ३२, रा. इंदिरा नगर, देवळा) यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८०, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम