Skip to content

केटीएचएम महाविद्यालयात ‘वॉक फॉर आय डोनेशन’ रॅलीचे आयोजन


नाशिक : १९९५ ला माझ्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यावर माझ्या आईने किडनी दिल्यामुळे मी आज लाखोंच्या वर नेत्र शस्त्रक्रिया करू शकलो. म्हणून योग्य वेळी नेत्रदान करून अंध बांधवांना दृष्टी मिळवून द्यावी, असे आवाहन प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.

येथे केटीएचएम महाविद्यालयात आज जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त ब्लाईड वेलफेअर ऑर्गानायझेशन व मविप्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मरणोत्तर नेत्रदान अभियानाला सुरुवात झाली. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून ‘वॉक फॉर आय डोनेशन’ रॅलीला सुरुवात केली. यावेळी अंध बांधव, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था व हजारो नाशिककर या रॅलीत सहभागी झाले होते.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी यावेळी बोलताना रक्तदान चळवळ दृढ असून अवयवदानाची चळवळ वाढली पाहिजे. त्यातही प्रामुख्याने नेत्रदान हे सर्वोच्च दान असून यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनात नेत्रदान करण्याची तयारी करावी. कारण हे डोळे मृत्यूनंतरही जग पाहू शकतात. तसेच, नेत्रदान हा वैज्ञानिक पुनर्जन्म असून प्रत्येकाने विज्ञानाची कास धरावी असे सांगताना भारत हा कर्णाचा, रामाचा देश आहे. पण श्रीलंका हा रावणाचा देश असूनसुद्धा तिथे दरवर्षी दोन लाख डोळे दान केले जातात. त्यामुळे भारताला श्रीलंकेकडून दरवर्षी १० हजार डोळे विकत घ्यावे लागतात. यावेळी अवयव दानाचे महत्व सांगतांना, त्यावेळी मला माझ्या आईने किडनी दिल्याने आतापर्यंत १ लाख ६५ हजार नेत्र शस्रक्रिया आपण करू शकलो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सरचिटणीस अॅड  नितीन ठाकरे यांनी समाजात नेत्रदानाविषयी जनजागृती आवश्यक असून अवयवदान चळवळ व्यापक करणे गरजेचे आहे. त्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी पांढरी काठी दिनानिमित्त रन वॉकचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी रविंद्र सपकाळ, अरुण भारस्कर व इतर मान्यवरांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

सदर वॉक मॅरेथॉन चौक येथून सुरु होऊन ती कॅनडा कॉर्नर, एचपीटी कॉलेज, गंगापूर रोड मार्गे पुन्हा येत मॅरेथॉन चौकात समारोप करण्यात आला. नेत्रदानाबद्दल समाजात जनजागृती करणे, हा या अभियानाचा उद्देश असून आपण केलेल्या मरणोत्तर नेत्रदानामुळे हे सुंदर जग एखादया दृष्टीहीन व्यक्तीला बघता येईल. त्यामुळे आपण नेत्रदान करावे व तमाम नाशिककरांनी या अभियानात सहभाग नोंदवून आपल्या जवळच्या व्यक्तींनाही यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!