Nashik Loksabha | ‘मातोश्री’वरून दुसऱ्यांदा बोलावणे; करंजकरांची ठाकरेंकडे पाठ..?

0
31
Nashik Loksabha
Nashik Loksabha

Nashik Loksabha |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, महायुतीकडून नाशिक लोकसभेचे तिकीट कोणाला दिले जाणार..? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे गेल्या दोन टर्मपासून तिकीटाच्या आशेवर असलेले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे नाराज आहेत. तर, त्यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. (Nashik Loksabha)

नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने विजय करंजकरांना डावलून ऐनवेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना तिकीट जाहीर केले. यामुळे विजय करंजकर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आता दुसऱ्यांना मातोश्रीवरून बोलावणे आले असून, त्यांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विजय करंजकर आता काय भूमिका घेणार किंवा ते बंड करणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Nashik Lok Sabha | गोडसेंच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरे; गोडसेंचे आणि मनसेचे नाते काय..?

निवडणूक लढवणार आणि पाडणार पण… 

नाशिक लोकसभेचे तिकीट हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुखपद विजय करंजकर यांनाच मिळणार हे  जवळपास निश्चित होते. इतकेच काय तर या दृष्टीने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. त्यांना प्रचारासाठी वेळ मिळावा याकरिता त्यांच्याकडील जिल्हाप्रमुखपद हे तत्कालीन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे सोपविले होते. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच बाकी होती असे असताना, ठाकरे गटाने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आणि यात नाशिकची उमेदवारी ही राजाभाऊ वाजे यांना जाहीर करण्यात आली. यामुळे नाराज विजय करंजकर यांनी ‘आपण निवडणूक लढवणार आणि पाडणार पण’ अशी भूमिका घेतली होती. (Nashik Loksabha)

Nashik Loksabha | ‘मातोश्री’वरून दुसऱ्यांदा बोलावणे  

तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या विजय करंजकरांची नाराजी दूर केली जाईल, असे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. यासाठी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय करंजकर यांना बोलावले होते. मात्र करंजकरांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्यांना ‘मातोश्री’वरून बोलावणे आले आहे. मात्र, आता पुन्हा त्यांनी जाणे टाळले. (Nashik Loksabha)

Nashik Loksabha | नाशिकची जागा शिवसेनेलाच; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब..?

करंजकर शिंदे गटात जाणार..?

दरम्यान, महायुतीत नाशिकच्या जागेवरून अजूनही खडाजंगी सुरू आहे. सध्या नाशिकमध्ये शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे इच्छुक असून, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचेही नाव नवीन सर्व्हेमध्ये होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोरस्ते यांना बोलावून घेतल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा होती. नाशिकची जागा ही शिवसेनेची पारंपारिक जागा असून, ही जागा आपल्याकडेच रहावी. यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही आहेत.(Nashik Loksabha)

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्याविरोधात करंजकर देखील सक्षम उमेदवार असल्याने शिंदे गटाकडे हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांच्यासोबतच आता करंजकर  हा तिसरा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे करंजकर शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती असून, त्यांची पुढील भूमिका काय असणार आणि महायुतीचा नाशिकचा उमेदवार कोण असणार..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here