लहवितचे भूमिपुत्र संतोष गायकवाड यांना वीरमरण

0
3

नाशिक : तालुक्यातील लहवित गावचे भूमिपूत्र आणि तोफखाना दलातील लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसाम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या वीरमरणाचे वृत्त कळता संपूर्ण लवहित गाव व तालुक्यात शोककळा पसरली आहे.

लान्सनायक संतोष गायकवाड हे आसाममधील होजाई जिल्ह्यातील लंका भागात कार्यरत होते. रक्त गोठविणाऱ्या या प्रदेशात गायकवाड हे कर्तव्य बजावत असताना त्यांना मेंदूतील रक्तस्त्रावाचा त्रास झाला. त्यांनतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना कोलकात्यातील लष्करी रुग्णालयात दाखल केले. तिथे दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, आज पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांचे पार्थिव आज रात्री बारा वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात दाखल होणार असून गायकवाड यांच्या गावी लहवित येथे लष्करी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेले सैनिक संतोष गायकवाड हे तोफखाना केंद्राच्या २८५ मिडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. तब्बल १६ वर्षे ते आपले कर्तव्य बजावत होते. अवघ्या दहा महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. मात्र, त्याअगोदर त्यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

शहीद गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण लहवितमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण देवळाली कॅम्प येथील तेजुकाया महाविद्यालय (भाटिया कॉलेज) येथे झाले. त्याच दरम्यान ते लष्करात भरती झाले होते. दरम्यान, सुट्टीदरम्यान ते या महाविद्यालयात अनेकदा भेट द्यायचे. ऐन दिवाळीत त्यांच्या या निधनाने संपूर्ण लहवित पंचक्रोशी व जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here