Skip to content

मनपा दिवाळीनंतर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार

नाशिक महापालिका

नाशिक : शहरातील सर्वच भागात अनधिकृत अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पक्के बांधकामे, तसेच अतिक्रमित टपर्‍या यांवर आता लवकरच हातोडा चालवण्यात येणार आहे. कारण दिवाळीनंतर महापालिका शहरातील सर्व सहा विभागात अतिक्रमण मोहीम राबविणार आहे.

गत पंधरवड्यात नाशिक-औरंगाबाद हायवेवरील मिरची हॉटेलजवळ एका बसचा भीषण अपघात घडल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर सदर चौकात असलेले पक्क्या बांधकामाचे अतिक्रमण दिवाळीपूर्वीच काढण्यात आले होते. तेव्हा या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार वाहतुकीस अडथळा होऊन अपघातास कारणीभूत असलेले अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पक्के बांधकामे हटवण्याबाबत कारवाईही सुरू केली आहे. त्यानुसार आता दिवाळी नंतर शहरातील सर्व सहा विभागात अतिक्रमण मोहीम तीव्र होणार आहे.

त्यानुसार प्रशासनातर्फे सर्व विभागातील चौकांमध्ये असणार्‍या अतिक्रमित टपर्‍या, अनधिकृत बॅनर, होर्डिंग तसेच महामार्गावरील चौक, फलक आदींची यादी तयार करण्यात आली असून दिवाळीनंतर या सर्वांवर हातोडा पडणार आहे. तसेच यासाठी मनपा अतिक्रमण विभागाने शहर पोलीस आयुक्तांना सदर मोहिमेसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अश्या मागणीचे पत्र दिले आहे.

दरम्यान, मिरची हॉटेल चौकातील अतिक्रमण मोहीम जवळपास पूर्ण करण्यात आली असली, तरी काही किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमण राहिले आहे. दरम्यान महापालिकेला पोलीस बंदोबस्त मिळाल्यास शहरातील सहाही विभागात एकाच वेळेला मोठी अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे समजते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!