Congress Politics | विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून प्रत्यक्ष भेटीची मागणी केली आहे. तसेच भेटीसाठी वेळ मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.
मतदार यादीतून मतदारांची नावे वगळल्याचा आरोप
काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून ईव्हीएम वर झालेली मतदानाची नोंद त्याचप्रमाणे, प्रत्यक्ष मतदान यातील आकडेवारीत मोठी तफावत आढळून आल्याचे दावे करण्यात आले आहेत. हे आरोप कुठल्याही दुष्ट हेतूने करण्यात आलेले नसून, प्रत्यक्ष आकडेवारी व मतदानात मोठी तफावत आढळून आल्याचे पक्षाकडून वारंवार सांगितले जात आहे. देशाच्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी देखील याबाबत शंका व्यक्त केली असून निवडणूक ही मुक्त व निष्पक्ष वातावरणात झाली पाहिजे. असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. मतदार यादीतून काही मतदारांची नावे वगळण्याच्या निर्णयावर देखील काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
तसेच कुठल्या गोष्टीचा आधार घेत ही नावे वगळण्यात आली? अशी विचारणा देखील पक्षाकडून करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात जवळपास 10 हजार मतांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 या काळामध्ये महाराष्ट्रात 47 लाख मतदारांची वाढ झाल्याचा आरोप देखील काँग्रेसने केला आहे.
मतदानाच्या टप्प्यात झालेल्या वाढीवर काँग्रेसकडून आक्षेप
मतदान प्रक्रिया संपल्यानंतर देखील मतदानाच्या टप्प्यात झालेल्या वाढीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता 59 टक्के मतदान झाले होते. परंतु रात्री 11:30 पर्यंत मतदानाची टक्केवारी 67% वर पोहोचली संध्याकाळी 5 नंतर मतदार केंद्राबाहेरील रांगांमध्ये 76 लाख मतदार उभे होते का? असा सवाल देखील काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे व म्हणणे मांडण्याकरिता वेळ द्यावी. अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्ष प्रभारी रमेश चेन्नीथला व खासदार मुकुंद वासनिक यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम