Mahayuti | राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला आणि नाराजीनाट्य संपून राज्यात ‘देवेंद्रपर्व 3.0’ सुरू झाले. यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे मंत्रीमंडळ विस्ताराकडे. नागपुर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे असल्याने याच आठवड्यात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यासाठी महायुतीत जोरदार बैठकांचा धडाका सुरू असून, यातच आता शिंदे गटाच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदा इच्छुकांची यादी मोठी असून, सर्वच आमदारांना नामदार होण्याची इच्छा आहे. त्यामुळे नेत्यांची चाचपणी सुरू झाली असून, अशातच शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागवले आहे आणि यात दोन मंत्री नापास झाल्याचेही वृत्त समोर येत आहे.
Mahayuti | ‘हे’ मंत्री नापास; ‘हे’ नवे आमदार होणार नामदार..?
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिनसेनेचे माजी मंत्री आणि मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचे प्रगती पुस्तक तयार केले आहे. या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री हे नापास झाले असून, ते नापास झालेले मंत्री हे संजय राठोड आणि अब्दूल सत्तार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोघांना डच्चू मिळणार का..? हे पहावे लागणार आहे. तसेच या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असलेले ५ आमदारदेखील पास झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या पाच आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार का..? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Oath Ceremony | ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस..’; राज्यात ‘देवेंद्रपर्व 3.0’ला प्रारंभ
शिवसेनेकडून मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांमध्ये मागील वेळीच कोट शिवून शपथविधीच्या तयारीत असलेले भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे हे पाच आमदार पास झाल्याची माहिती समोर आली आहे. तर महायुतीच्या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.
‘या’ मंत्र्यांची वाट खडतर; शिवसेनेला नमते घ्यावे लागणार..?
यावेळी मंत्रिमंडळात भाजपचे पारडे जड असेल. तर, शिवसेनेला काहीसे झुकते घ्यावे लागणार असल्याची चर्चा आहे. तर, भाजपचे ज्येष्ठांनाच संधी देण्याचे धोरण शिवसेनेलाही मान्य आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड यांची वाट काहीशी खडतर असून, संजय शिरसाट, भरत गोगावले यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तर, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई आणि यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांचा मार्ग मोकळा असल्याची माहिती आहे.
शिंदेंनाच तडजोड करावी लागणार..?; जुन्याच खात्यांवर शिवसेनेला समाधान मानावे लागणार..?
तरी कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्री पदे येणार..?. याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. मात्र, खात्यांवरून भाजपचे पारडे जड असेल आणि शिवसेनेला नमते घ्यावे लागणार असल्याचे दिसत आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच गृह खात्यावरून महसूलवर समाधान मानावे लागणार असून, त्यांच्या आवडीचे नगरविकास खातेही त्यांना मिळणार नसल्याचे दिसत आहे. तर, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी आणि परिवहन अशा जुन्याच खात्यांवर शिवसेनेला समाधान मानावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम