Skip to content

दुचाकी दुभाजकावर आदळून तरुणी ठार; तर दुचाकीचालक जखमी


नाशिक – शहरातील गंगापूर रोड परिसरात एका दुचाकीचा अपघात झाला असून ज्यात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाली आहे.

गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौक येथे सकाळी १०च्या सुमारास हा अपघात घडला आहे. सदर तरुणी आपल्या दुचाकीने अशोकस्तंभाहून सातपूरच्या दिशेने जात असताना शेजारुन आलेली कार भरधाव वेगाने गेल्यामुळे तरुणीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी दुभाजकाजवळील झाडाला आदळली. या अपघातात दुचाकीचालकाच्या मागे बसलेली २३ वर्षीय तरुणी रस्त्यावर पडली. त्यात तिचा मृत्यू झाला आहे.

रुचिता राजेश बोराडे (वय २३, श्रीधर कॉलनी, पंचवटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर रेश्मा सतीश बोराडे (वय २४, रा. मखमलाबाद) असे जखमी दुचाकीचालक तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या दोघी जणी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी पंचवटीतून सातपूर एमआयडीसीतील कंपनीत जाण्यासाठी स्कुटीवरुन निघाल्या होत्या, त्यावेळी जोरात पाऊस चालू होता. त्या अशोकस्तंभ चौकातून जुन्या गंगापूर नाक्याकडे जात असताना स्कुटीशेजारून एक भरधाव कार गेली. त्यामुळे दुचाकीचालक रेश्माचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी दुभाजकावर आदळली. त्यात रेश्माच्या पाठीमागे बसलेली रुचिता रस्त्यावर पडली.

हा अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. नागरिकांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यावेळी पाठीमागे बसलेल्या रुचिताच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर दुचाकीचालक रेश्मा गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

नियमाप्रमाणे चालकाबरोबरच मागील शिटवर बसणार्‍यालाही हेल्मेट अनिवार्य आहे. पण दुर्दैव असे की, पाठीमागे बसलेल्या तरुणीने हेल्मेट घातले नव्हते. जर तिने हेल्मेट घातले असते तर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला नसता. म्हणून, पाठीमागे बसणाऱ्यांनीही हेल्मेट घालणे गरजेचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!