Skip to content

‘धगधगती मशाल’ अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची; समता पार्टीची याचिका फेटाळली


मुंबई : दिल्ली हायकोर्टाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हाविरोधातील समता पार्टीची याचिका फेटाळत मोठा दिलासा दिला आहे. याचा अर्थ, शिवसेना ठाकरे गट आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत “धगधगती मशाल” या निवडणूक चिन्हानेच उभे राहणार आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्षाचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. यावेळी दोन्ही गटाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हावर दावा ठोकल्याने अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” हे नाव व “धगधगती मशाल” चिन्ह देण्यात आले. तर, शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” या पर्यायी नावासह “ढाल-तलवार” हे चिन्ह देण्यात आले होते.

मात्र, ठाकरे गटाला देण्यात आलेल्या चिन्हावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने आक्षेप घेतला होता. या चिन्हावर समता पक्षाने दावा करत ठाकरे गटाला हे चिन्ह या पोटनिवडणुकीत वापरण्यास मनाई करावी, यासाठी पक्षाच्या वतीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली असून दिल्ली हायकोर्टाने यासंदर्भातील पार्टीची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

याचिका फेटाळल्यावेळी काय म्हणाले न्यायमूर्ती ?

दरम्यान, समता पक्षाच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी ही याचिका फेटाळताना म्हटले की, मशाल चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यास समता पक्षा अपयशी ठरला आहे. कोणताही अधिकार नसताना याचिकाकर्ते चिन्ह रद्द करण्यासाठी आदेश मागू शकत नाही. यासोबतच २००४ सालीच समता पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली होती, हे सुनावणीदरम्यान समोर आले. आणखी एक बाब म्हणजे समता पक्षाने २०१४ मध्ये पेटती मशाल चिन्हाखाली निवडणूक लढवली होती, तर २०२० ची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढली होती. त्यामुळे ही याचिका आम्ही फेटाळत आहोत, असे म्हणाले आहे. सन १९९४ साली दिवंगत जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी या समता पार्टीची स्थापना केली होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!