Nashik | वेगाने विस्तार होत असलेल्या नाशिक शहरात वाढत्या लोकसंख्येसह क्षणिक आणि पूर्ववैमनस्यातून होत असलेल्या प्राणघातक हल्ल्यांमध्येदेखील वाढ होताना, ह्या खुनाच्या घटनांनी थेट मागील पाच वर्षांचे ‘रेकॉर्ड ब्रेक’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२०१८ मध्ये नाशिक शहरात ३५ खुनांच्या घटनांची नोंद झाल्यानंतर हे प्रमाण २५ ते ३० यादरम्यानच स्थिर होते. पण, यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये तब्बल अकरा महिन्यांतच ३६ खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गुन्हेगारी ही नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांच्या ठोस कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीत सात महिन्यांतच तब्बल तीस खुनाच्या घटना घडल्यानंतर कायदा आणि सुव्यस्थेसंदर्भात मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.
यानंतर नाशिक शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन, संशयितांची धरपकड, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई, स्थानबद्धता अशी पाऊले उचलल्यावर गुन्हेगारी काही अंशी नियंत्रित झाली. पण, नोव्हेंबरच्या अखेरीस पुन्हा एका पाठोपाठ दोन खून झाल्याने ‘स्ट्रीट क्राइम’चे प्रकारही उघड झालेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नुकतीच शहर पोलिस आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतल्यामुळे परिसरनिहाय प्रभावी पोलिसिंग आणि ‘क्वीक रिस्पॉन्स’ याबाबत पोलिसांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पोलिसांची कार्यपद्धती ही बदलत असली, तरी रस्त्यावरील गुन्हेगारी आणि गंभीर गुन्ह्यांत घट होण्यासाठी काही ठोस कारवाईची अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.
पोलिसांत असलेल्या नोंदी…
- २७ ऑगस्टपर्यंत नाशिक शहरात तब्बल २९ खून
- २८ नोव्हेंबरपर्यंत नाशिक शहरात ३६ खून
- गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचाही सहभाग
- नव्याने विकसित होणाऱ्या भागांत गुन्हेगारीत वाढ
मागील सात वर्षांच्या खूनांच्या नोंदी
२०१७ – ४१ खून
२०१८ – ३५ खून
२०१९ – २४ खून
२०२० – २५ खून
२०२१ – २९ खून
२०२२ – ३० खून
२०२३ – ३६ खून
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम