पुण्यात आभाळ फाटले; अनेक रस्त्यांना आले नदीचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत

0
3

पुणे : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी तेही ऐन दिवाळीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातही काल रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले.

काल रात्री पाऊणे दहा ते अकराच्या सुमारास पुण्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. तसेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर व परिसरातही पावसाचे पाणी साचले होते. दोन तास पडलेल्या पावसाने तब्बल १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद शिवाजीनगर येथील पर्जन्यमापक केंद्रावर झाली आहे. तसेच आजही दुपारनंतर पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्यामुळे स्थानिक प्रशासन सकाळपासूनच अलर्ट मोडवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी शिरण्याच्या व झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एका दुचाकीवर झाड पडल्याने एक जण जखमी झाल्याचीही घटना घडली आहे. दरम्यान, पावसामुळे १२ नागरिक अडकून पडले होते. यावेळी अग्निशामक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने त्या सर्वांची सुटका केली आहे.

दरम्यान, पुण्यात पडलेल्या या जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच अनेक भागात पावसाचे  पाणी शिरल्यामुळे तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. फक्त शहरातही नाही, तर ग्रामीण भागातही जोरदार पाऊस पडला असून अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

खासदार सुळेंनी घेतला परिस्थितीचा आढावा 

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी काल रात्री पडलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेल्या तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी आज  सकाळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ज्यांना मदतीची गरज आहे, तिथे सर्व यंत्रणा सज्ज असून यावेळी नागरिकांना गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here