Skip to content

दुर्दैवी… केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; ६ जणांचा मृत्यू


दिल्ली : केदारनाथ येथे नुकतीच एक दुर्घटना घडली आहे. येथे भाविकांना घेऊन जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळले असून या अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथपासून २ किमी अंतरावर असलेल्या गरुडचट्टी येथे हेलिकॉप्टरचा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी या हेलिकॉप्टरमध्ये एकूण ६ जण होते, पण या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसून यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून सुरु आहे. उत्तराखंड येथील मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रधान सचिव अभिनव कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

मिडियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे असून हे हेलिकॉप्टर केदारनाथहून परतत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. दरम्यान, ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो गौरीकुंडजवळचा रस्ता हा केदारनाथ धामचा जुना मार्ग होता. दरम्यान, अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये सहा जण होते, त्यातील सर्व ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दाट धुक्यांमुळे झाला हा अपघात ?

दरम्यान, केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या दुर्घटनास्थळावर एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके आणि स्थानिक जिल्हा प्रशासन बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत. या घटनेचा व्हिडियो समोर आला आहे. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

याआधीही झाला केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात

याआधीही २०१९ मध्ये भाविकांना केदारनाथहून फाटा इथे घेऊन जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आणि यादरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. सुदैवाने यात हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह सहा प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती. तसेच २०१३ मध्येही केदारनाथ दुर्घटनेदरम्यान बचावकार्य करताना हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरसह तीन हेलिकॉप्टर कोसळले होते. मात्र, यात २३ जणांचा बळी गेला होता.

अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली 

दरम्यान, या दुर्दैवी अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!