नाशिक : शहरात बेघर नागरिकांची वाढती संख्या पाहता त्यांना निवारा देण्यासाठी महापालिकेकडून चार ठिकाणी निवारागृहे बांधण्यात येणार आहे.
मनपाच्या समाजकल्याण विभागाने ५८० क्षमतेच्या निवारागृहाचा सविस्तर अहवाल शासनाला सादर केला आहे. त्या अंतर्गत शहरातील पंचवटी, सातपूर, पूर्व व नाशिक रोड या विभागात हे निवारागृहे उभारले जाणार आहेत. सध्या शहरात बेघरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिग्नल, मुख्य चौकांमध्ये हे बेघरांच्या घरातील लहान मुले वाहनधारकांकडून भीक मागतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच ह्यामुळे शहराचा बकालपणाही समोर येतो.
म्हणून सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी निर्वासित गृह बांधण्याच्या सूचना सर्व महापालिकांना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने आधी गंगाघाटावर निवारागृहे बांधण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींनी ह्यास विरोध केला होता. आता सिग्नलवरील वाढत्या बेघरांची संख्या लक्षात घेता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरात निवारागृहे उभारण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तातडीने हा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला.
जून २०२१ पासून मनपाच्या संत गाडगे महाराज धर्मशाळा व इंद्रकुड येथे सुमारे १७० बेघरांना निवारागृहात आसरा दिला जात आहे. पण ह्या नव्या अहवालानुसार आता शहरात एकूण ५८० क्षमतेचे निवारागृहे चार ठिकाणी उभारले जाणार आहेत. ज्यात चेहेडी, वडाळा, तपोवन आदि ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती उपायुक्त करुणा डहाळे यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम