Skip to content

नवनीत राणांची दिवाळी तुरुंगात ? ; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर


मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण, बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने हा वॉरंट जारी केला असून मुंलुंड पोलिसांना यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

याआधीही शिवडी कोर्टाने नवनीत राणांना वॉरंट बजावला होता. तेव्हा त्यांनी मुंबई सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित असून सेशन कोर्टाने अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्यामुळे शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र तोपर्यंत नवनीत राणांकडे कोणताही दिलासा नाही.

राणा यांच्यावर काय आहे आरोप ?

नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नवनीत यांच्या वडिलांनी फसवणूक करुन हे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. यासंदर्भात मुलुंड पोलीस ठाण्यात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे हे प्रकरण ?

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका २०१७ मध्ये मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. त्यात नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने ८ जून २०२१ ला खासदार नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यासोबतच त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. तेव्हा खासदार राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तेव्हा २२ जून २०२१ रोजी झालेल्या सुनावणीत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना दिलासा दिला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!