Nashik Political | राज्यामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून या अनुषंगाने भाजपाने काल दि. 20 ऑक्टोबर रोजी 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर आज सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी अजित पवार गटाची आणि शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु उमेदवारी यादी जाहीर होण्याआधी महायुतीमध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Nashik Political | देवळाली मतदारसंघात शिंदे गटाला खिंडार; ‘या’ नेत्याने केला पक्षप्रवेश निश्चित
नांदगाव मतदार संघात रस्सीखेच
महायुतीतील नांदगाव विधानसभेच्या मतदारसंघात सुहास कांदे आमदार आहेत. परंतु यावेळी या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दावा केला असून या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ लढण्यासाठी इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर आज नांदगाव-मनमाड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईत अजित पवारांची त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी भेट घेत “भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच “आपण सुहास कांदे यांचे काम करणार नाही.” अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
“नांदगावची जागा राष्ट्रवादीला द्या” कार्यकर्त्यांची मागणी
यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी. ही अशी मागणी केली. यावेळी जवळजवळ 400 ते 500 कार्यकर्ते देवगिरी वर दाखल झाले होते. “नांदगावची जागा राष्ट्रवादीला द्या. अथवा शिवसेनेचा उमेदवार बदला.” अशी मागणी कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली. “शिंदेसेनेचा उमेदवार दिला, तर त्यांच्याकरता काम करणार नाही” असे देखील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
Nashik Political | नाशकात शिंदे सेनेची कोंडी; विधानसभेसाठी फक्त दोनच जागा मिळणार?
समीर भुजबळ निवडणूक लढवण्यावर ठाम
सध्या समीर भुजबळ हे महायुतीकडून उमेदवारी मिळेल अशी आशा लावून बसले असून सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सर्वत्र आहे. परंतु समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच मविआकडून किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढता येईल का? याची देखील चाचपणी भुजबळांकडून सुरू असल्याचे समजते आहे. शिवाय ते महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम