नाशिक – शहरात एका दुकानदाराकडून खंडणी उकळवण्याचा अजब प्रकार समोर आला असून एका प्रसिद्ध मिठाई दुकानदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील गंगापूर रोडजवळील सावरकरनगर परिसरात ही प्रकार घडला आहे. ह्या भागातील प्रसिद्ध मधुर स्वीट्स दुकानावर एका इसमाने काही खाद्यपदार्थ खरेदी केले. हे पदार्थ घेऊन तो दुकानाबाहेर गेला आणि पुन्हा दुकानात येऊन त्याने खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांत किडा आढळल्याची तक्रार करू लागला. नंतर त्याने या स्वीट्सच्या मालकाला फोन करून तुमच्या दुकानामध्ये खाद्यपदार्थात किडा आढळला असून, याबाबत मी सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यानंतर स्वीट्सच्या मालकाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रकरण मिटवण्याकरता त्याने स्वीट्स मालकाकडे चक्क दोन लाख रुपयांची मागणी केली.
त्यानंतर तो वेळोवेळी मिठाई मालकाला व्हाॅट्सअॅप कॉल करून कधी एक लाख रुपये, तर कधी पन्नास हजार रुपयांची मागणी करत होता. अखेर त्या मिठाई मालकाने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या फुटेज मध्ये हा इसम स्वतः खाद्यपदार्थांमध्ये किडा टाकताना आढळून आल्याची माहिती कपिल भदाणे यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, याच ग्राहकाने काही दिवसांपूर्वी इंदिरानगर येथील सागर स्वीट्स दुकानातही असा प्रकार केला होता. ह्यात मात्र, सागर स्वीट्सच्या मालकाला फोन करून पैसे न दिल्यास दुकानातील खाद्यपदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकीदेखील दिली होती, अशी माहिती दीपक चौधरी यांनी दिली आहे.
दरम्यान या घटनेबाबत सदर नागरिकाविरोधात गंगापूर रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलीस घटनेची पुढील कारवाई करत आहे. तसेच त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असाच प्रकार केल्याची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम