Skip to content

यंदा नाशिककरांना मिळणार २०० दलघफू जादा पाणी !

gangapur

नाशिक – येत्या आगामी वर्षासाठी नाशिक महापालिका नाशिककरांना पिण्याच्या पाण्यासाठी गंगापूर, दारणा, मुकेणे आदी धरणांमधून सुमारे ५८०० दशलक्ष घनफूट इतके पाणी आरक्षित करणार आहे. म्हणजेच, गेल्यावर्षीपेक्षा २०० दशलक्ष घनफूट जादा पाणी नाशिककरांना मिळण्याची शक्यता आहे.

शहरातील वाढती लोकसंख्या व त्यानुसार पाण्याची वाढती मागणी पाहता आयुक्तांकडून हा प्रस्ताव मांडून तो जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागासमोर सादर होणार आहे. शहराला ह्या तिन्ही धरणांमधून प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै ह्या कालावधीसाठी धरणांमधील पाणी राज्य शासनाकडून आरक्षित केले जाते. यासाठी आरक्षित पाण्याची मागणी १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाकडे नोंदवणे बंधनकारक आहे. त्यानुसार दरवर्षी पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी आरक्षणाचा प्रस्ताव तयार केला जातो.

गेल्यावर्षी महापालिकेने सन २०२१-२२ सालासाठी गंगापूर धरणांमधून सुमारे ४००० दलघफू, दारणा धरणांतून २०० दलघफू व मुकेणेतून १४०० दलघफू अशी ५६०० दलघफू पाण्याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावेळी समाधानकारक पावसामुळे मुबलक पाणीसाठा बघता जिल्हाधिकाऱ्यांनी मनपाची मागणी मान्य केली होती. यंदा गंगापूर धरणातून ४२०० दलघफू, मुकेणेतून १५०० दलघफू तर दारणा धरणातून १०० दलघफू पाण्याचा आरक्षणाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील, याकदे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!