भ्रष्टाचारी कंत्राटदारांनी ग्रामपंचायतीच्या खात्यात परस्पर भरली भ्रष्टाचाराची रक्कम ?

0
1

लोहोणेर – जिल्ह्यातील लोहोणेर ग्रामपंचायतीत एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले असून तिथे संबंधित कंत्राटदाऱ्यांनी चक्क ग्रामपंचायतीच्या खात्यात रक्कम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोहोणेर ग्रामपंचायतीत १५व्या वित्त आयोगाकडून गावातील गुरांच्या दवाखान्याजवळ स्वच्छतागृह बांधण्यासाठी कंत्राटदार दिनेश सोनार यांना दोन लाख रुपयांत हे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, सदर कामापोटी फक्त १,४२,७३२/- इतके रुपयेच खर्च झाल्याचे ह्याच्या पुनर्मूल्यांकनानंतर निष्पन्न झाले. तसेच, सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम विभागाकडून अंतिम मूल्यांकन दाखला न घेताच ग्रामसेवकांनी कंत्राटदाराला संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतर सदरील कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याने अखेर याविरोधात सामाजिक कार्यकर्ते चेतन परदेशी व समाधान महाजन यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली होती.

दोघांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीनंतर सदर कामात भ्रष्टाचार झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले. त्यानंतर या भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशी अहवालात कंत्राटदार, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांना दोषी ठरवण्यात आले होते.

मात्र, ह्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने कोणत्याही शासकीय आदेशाशिवाय ४४,३६३/- रुपयांची रक्कम गेल्या २९ ऑगस्टला ग्रामपंचायतीच्या खात्यात परस्पररीत्या भरली आहे. याचा अर्थ, कंत्राटदाराने ज्या रक्कमेचा भरणा केला होता त्यावरून त्याने भ्रष्टाचार केल्याचेही मान्य केले आहे.

म्हणजेच हा एकप्रकारे चोरी करून ती लपवण्याचा लांच्छनास्पद प्रयत्न करून भ्रष्टाचाराची रक्कम शासकीय खात्यात वर्ग करून सदरचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न लोहोणेरचे ग्रामसेवक यू.बी. खैरनार व कंत्राटदार दिनेश सोनार यांच्याकडून होताना दिसत आहे. जिल्हापरिषद स्तरावर ह्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याबाबत प्रस्तावित असतानाच त्यांनी मध्येच असा घाट घातला आहे.

दरम्यान, संबंधित भ्रष्टचार करणारे अधिकारी, पदाधिकारी व कंत्राटदार यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे असून, त्याशिवाय भ्रष्टाचाराला चाप बसणार नाही. यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष विठोबा द्यानध्यान हे ह्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असून ह्या घोटाळ्यातील दोषींवर योग्य कारवाई न झाल्यास आम्हाला न्यायालयात जाण्यास मागे-पुढे पाहणार नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते चेतन परदेशी व समाधान महाजन यांनी व्यक्त केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here