नाशिक : शहरातील लाचखोरीचे लोण आता अति संवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणारा व लष्कराच्या हद्दीत असणारा गांधीनगरमधील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्येही (कॅट्स) पसरले असून सीबीआयच्या पथकाने गुरुवारी (दि. १३) लाच घेणाऱ्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
मेजर हिमांशु मिश्रा व कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले अशी या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे असून त्यांनी गुरुवारी येथील कॅट्सच्या आवारात तक्रारदार ठेकेदाराकडून १.२० लाखाची लाच स्वीकारताना सीबीआयच्या पथकाने त्या दोघा लष्करी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, सैनिकी आस्थापनामध्ये अशाप्रकारची कारवाई पहिल्यांदाच उघडकीस आल्यामुळे आस्थापनांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कॅट्सच्या आवारात तक्रारदार ठेकेदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांची लाचेची मागणी मेजर हिमांशु मिश्रा, कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी केली होती. त्याची माहिती तक्रारदाराने सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रारीच्या स्वरुपात दिली होती. त्यानुसार सदर पथकाने सापळा रचून त्या दोघा अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सदर लाचेची रक्कम घेताच त्यांना ताब्यात घेतले.
आरोपी हिमांशु मिश्रा हे सहायक गॅरिसन इंजिनिअर पदावर असून, मिलिंद वाडिले हे कनिष्ठ इंजिनिअर पदावर असल्याची माहिती यावेळी सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रणजित पांडे यांनी दिली आहे. दरम्यान, ह्या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून अधिक चौकशीसाठी न्यायालयाकडे सीबीआय कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही पांडे यांनी यावेळी दिली आहे.
सध्या नाशिक शहर व जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांना पेव आला असून कॅट्सच्या आवारात झालेल्या लाचखोरीच्या घटनेने मोठी खळबळ माजवली आहे. जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची कीड सर्वात आधी जिल्हा परिषद, त्यानंतर जिल्हा रुग्णालय, महापालिकेपर्यंत आधीच पसरत असताना आता लष्करी अस्थापनेतदेखील पसरल्याने याची एकच चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये नुकताच स्थापन झालेल्या सीबीआयच्या पथकाची ही दुसरी कारवाई असून याआधी गेल्या महिन्यात सीबीआयच्या याच पथकाने नाशकातील केंद्रीय जीएसटीचे अधिकारी चंद्रकांत चव्हाणके यांना लाच घेताना मुद्देमालासह पकडले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम