नाशिक – थायलंड येथे एका आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मॉडेलिंगची संधी देण्याचे आमिष दाखवत कर्नाटकातील एका भामट्याने मुंबई नाका परिसरातील एका मॉडेलची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी वडाळा रोड येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अक्षय किर्ती जे रायचुरकर (रा. कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ९ व १० जुलै या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अक्षय रायचुरकर याने नाशिकमधील ह्या महिलेशी संपर्क साधला. त्याने महिलेचे मॉडेलिंगचे फोटो दाखवत त्याबाबत बँकॉक, थायलंड येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘मिस टुरिझम युनिव्हर्स २०२२’ या शोची माहिती दिली. त्यानंतर त्याने संबंधित मॉडेलचा विश्वास संपादित करत शोसाठी १ लाख ७० हजार रुपये लागणार असून, ज्यात नाशिक ते बॅकॉकपर्यंत ये-जा करण्यासह सर्व सुविधा दिल्या जातील, असे त्या महिलेला संशयिताने सांगितले.
मॉडेलिंग करणाऱ्या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवत २५ हजार रुपये दिले. त्यानंतर संशयिताने तिच्या पतीला ५५ हजार रुपये कर्नाटकमधील स्टेट बँकेच्या मुनिराबाद इथल्या शाखेतील बँक खात्यावर ट्रान्सफर करायला लावले, त्यानुसार ते पैसे ट्रान्सफरदेखील केले. मात्र दिलेले पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. व त्यानंतर त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार त्या संशयितावर गुन्हा दाखल झाला असून ह्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम