Skip to content

पुढील तीन ते चार तास अतिवृष्टीचा इशारा ; गरज असेल तरच बाहेर पडा


नाशिक: सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर,नाशिक रायगडमध्ये पाऊस जोरदार सुरू असून ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीन मार्गांवर लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आणि परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागात आज सकाळपासून तर काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

मुंबईचे भातसा धरण (जिथून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो) ओव्हरफ्लो होऊन त्यातून पाणी सोडले जात आहे. मुंबईत लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. मुंबईला लागून असलेल्या भिवंडी परिसरात तीन बत्ती भाजी मंडईत गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले आहे.

पुणे-नाशिक परिसरात पाऊस पडत आहे
नाशिक आणि पुण्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीचे पाणी सोडले जात आहे. पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्येही गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून 7 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नाशिकमध्ये चौथ्यांदा मुसळधार पाऊस, पूरस्थिती
यंदा चौथ्यांदा नाशिकच्या गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुतांडे मारुती च्या कमरेला पाणी लागले आहे. नांदूरमधमेश्वरा धरणातूनही जायकवाडीकडे पाणी सोडण्यात येत आहे. 36 हजार क्युसेकहून अधिक पाणी सोडले जात आहे.

ट्रॅफिक जॅम, पुढील तीन ते चार तास काळजी घ्या
मुंबईत एकीकडे मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन सेवेवर परिणाम झाला असून गाड्या उशिराने धावत असल्याच्या बातम्या येत आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे हवामान खात्याने नमूद केले असून मुंबईकरांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

मुंबई-ठाण्यात रात्रभर पाऊस, सकाळपासून जोर धरला
कमी दाबाचे क्षेत्र गुजरातमधून महाराष्ट्रात सरकल्याने मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे येथील रस्त्यांवर झाडांच्या फांद्या पडताना दिसत आहेत. मुंबई-ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रभर पाऊस झाला आणि सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला.

महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 16 आणि 17 सप्टेंबरला म्हणजेच आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकण आणि डोंगराळ भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीचे तज्ज्ञ केएस होसाळीकर यांच्या मते, येत्या तीन-चार दिवस महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहील.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!