वीज वापरात नसूनही शेतकऱ्याला तब्बल २८ हजारांचे लाईटबिल प्राप्त

0
2

नाशिक : राज्य वीज वितरण महामंडळकडून (महावितरण) दरवेळेस विजेचा वापर नसूनही जास्त रकमेची लाईटबिले देण्याची अनेक प्रकरणे ताजी असताना नुकतीच एक घटना घडली ती इगतपुरीत.

तिथे तालुक्यातील एका शेतकऱ्यास जास्त वीज वापर नसतानाही तब्बल २८ हजार २७० रुपयांचे लाईटबिल पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्याला हे बिल आले आहे, त्या बिलातील मीटरची नोंद करण्यासाठी आजवर वीज कर्मचारी फिरकलाच नसल्याचा दावा सदर शेतकऱ्याच्या कुटूंबियांनी केला आहे.

घडले असे की, इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील सोमा भस्मे ह्या शेतकऱ्याला शेतातील कामासाठी विजेची गरज असल्याने त्यांनी २०१३ मध्ये राज्य वीज वितरण मंडळाकडे अर्ज केला होता. कंपनीकडून तशी वीज जोडणीही झाली. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपल्या शेतात वीजपंप बसवता आला नाही.

त्या दरम्यान, सोमा यांचे २०१५ मध्ये निधन झाले व हा विषय मागे पडला. मात्र, सदर वीज जोडणी झाल्यानंतर मीटरच्या रिडींग नोंदणीसाठी एकदाही वीज कर्मचारी इथे फिरकला नाही. त्यामुळे विजेचा वापर झाला नसल्याचा दावा भस्मे कुटुंबियातील सदस्यांनी केला आहे. मात्र, असे असताना भस्मे कुटूंबियांना महावितरणकडून २८ हजार २७० रुपयांचे लाईटबिल प्राप्त झाले.

त्यामुळे हे लाईटबिल रद्द करण्याची मागणी करत सदर कुटूंबियांनी महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here