Maharashtra Politics | विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत महायुती सरकारने सत्ता राखली. तर 132 जागा मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 3 दिवस उलटले असले, तरी महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित झालेले नाही. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली जात असून भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. अशातच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री बाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
Maharashtra Politics | फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात ‘या’ नेत्यांची वर्णी…?
30 नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री पदाकरिता नाव निश्चित होईल
“30 नोव्हेंबरपर्यंत महायुतीच्या मुख्यमंत्री पदाकरिता नाव निश्चित होईल. त्यानंतर डिसेंबरमध्ये शपथविधी होईल.” अशी माहिती माजी केंद्रीयमंत्री व भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. रावसाहेब दानवे हे दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असून त्यानंतर बोलताना त्यांनी, “मुख्यमंत्री ठरवण्याबाबतची जबाबदारी एकट्याची नसून यावर तीनही पक्षांचे नेते चर्चा करतील.” असे म्हटले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नसल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
“मुख्यमंत्रीपद व शपथविधीचे घोडे कुठेही अडलेले नाही. भाजप राष्ट्रवादी शिवसेनेने निवडणूक एकत्र लढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा गटनेता निवडला गेला आहे. लवकरच भाजपचा गटनेता निवडला जाईल. यानंतर तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून पक्षश्रेष्ठींकडे आमदारांचे म्हणणे मांडतील व ते देतील तो निर्णय मान्य असेल.” असे दानवे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत!
पुढे बोलत, “प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री हवा असे वाटते. अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. परंतु सगळेजण एकत्र बसून चर्चा करत नाहीत तोवर मुख्यमंत्री ठरवण्याची जबाबदारी एकट्याची ही नाही. यावर सामूहिक चर्चा होईल 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री पदाकरिता नाव निश्चित होईल व डिसेंबरमध्ये शपथविधी होईल असे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, “एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. ते नाराज असल्याच्या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्री पदाचा व मंत्रीपदाचा फॉर्मुला एकत्र बसून ठरवला जाईल.” असेही ते यावेळी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम