नाशिक – शहराची ग्रामदैवता कालिकामातेचा यात्रोत्सव अवघ्या काही दिवसांनी येत आहे. पण यंदाच्या यात्रोत्सवावर पावसाचे संकट असल्यामुळे संस्थानकडून मंदिर परिसरात भव्य असे वाॅटरप्रुफ मंडप उभारण्यात येणार आहे.
कोविड संकटानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात हा यात्रोत्सव होणार आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक व २०० स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहे. तसेच, ज्या भाविकांना तत्काळ दर्शन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी मंदिर संस्थानकडून प्रती व्यक्ती १०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
येत्या नवरात्रीच्या कालावधीत म्हणजे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरमध्ये कालिकामाता यात्रोत्सव पार पडणार आहे. त्यासाठी या यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात मंदिर संस्थान व पोलीस यांची एकत्रित बैठक पार पडली आहे. तब्बल दोन वर्षांनी यात्रा भरणार असल्याने यंदा भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाविकांना सुखकर दर्शन घेता यावे यासाठी विशेष नियोजन केले जाणार आहे.
त्या अंतर्गत पावसाचा अंदाज बघता वाॅटरप्रुफ मंडप उभारणार आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरुष भाविकांच्या रांगांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी यात्रा काळात जास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी यंदा मंदीर २४ तास खुले राहणार आहे. तसेच मंदिर प्रांगणात प्रथमोपचार केंद्रही कार्यान्वित राहील.
तसेच, मंदिर परिसरात वीजपुरवठ्यात अडचणी उद्भवल्यास स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था केली आहे. व दर्शनास येणाऱ्या भाविकांचा दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आल्याचे मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवअण्णा पाटील यांनी सांगितले आहे. या बैठकीला संस्थांनचे पदाधिकारी व शहर पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम