Skip to content

पाथर्डी फाटा परिसरात बिबट्याचा मुक्त वावर; नागरिकांमध्ये भीती


नाशिक – पाथर्डीफाटा येथील पांडवलेणेच्या जवळ विक्रीकर भवन परिसरातील नववसाहतीत बिबट्याने शिरकाव केल्याची घटना रविवारी घडली आहे.

पांडवलेणी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसुन येत असतो. त्यातच रविवारी सकाळी आठच्या सुमारास संततधार पावसात बिबट्याने विक्रीकर भवनजवळील एका लोकवस्तीत अचानक एन्ट्री केली. यामुळे तिथल्या नागरिकांनी बिबट्याला हुसकून लावले व बिबट्या गाजरगवतातून पांडवलेणीच्या दिशेने पळाला. सुमारे अर्धा तास हा थरार सुरु होता.

दरम्यान, याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक विजय पाटील, रेस्क्यू वाहनचालक सुनील खानझोडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. व येथील मोकळ्या भूखंडावरील गाजरगवतामध्ये वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा तैनात केला. यानंतर दिवसभर भागात रेस्क्यू पथकाची शोधमोहीम सुरू होती, मात्र त्यांना कोठेही बिबट्या आढळून आला नाही. मात्र, या घटनेमुळे दिवसभर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस म्हणाले, बिबट्याच्या संचाराचे व्हिडीओ रहिवाशांनी दाखविले असून सदर भागात बिबट्याचा संचार आढळून आला आहे. यामुळे परिसरात दोन पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. जर परिसरात बिबट्या दिसल्यास गडबड, गोंधळ न करता त्वरित वनविभागास कळवावे व आपल्या लहान मुले, वृद्धांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!