Skip to content

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला बसणार महागाईचा फटका


द पॉईंट नाऊ: दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरोघरी ‘लक्ष्मी’ म्हणून पूजन केली जाणारी केरसुणी’ बाजारात दाखल झाली आहे. सततच्या पावसामुळे यंदा केरसुणीच्या उत्पादनावर झालेला परिणाम, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चातील वाढीचा परिणाम केरसुणीच्या किमतीवर झाला आहे. मागील वर्षी चाळीस रुपयांना विक्री होणारी केरसुणी यंदा पन्नास रुपयांवर पोहोचली आहे. आकारमानानुसार त्यांच्या दरात थोडीफार तफावत आढळते.

दिवाळीच्या सणासाठी शहरातील बाजारपेठ सजली असून, लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या लाह्या,बत्ताशे, रांगोळ्यांसह ‘लक्ष्मी’ म्हणजेच केरसुण्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, वाढत्या महागाईबरोबरच केरसुण्यांच्या दरात देखील वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहा टक्क्यांनी केरसुण्या महागल्या आहेत. नाशिकच्या बाजारात इंदौर, सुरत, जबलपूर आदी ठिकाणांहून विविध प्रकारच्या केरसुण्या विक्रीसाठी येतात. दिवाळीत शेकडो विक्रेत्यांना या माध्यमातून रोजगार मिळतो. लक्ष्मी पूजनासाठी लागणारी लहान केरसुणी यंदा वीस रुपयांवर पोहोचली आहे. तीस रुपयांना मिळणारी मध्यम आकाराची केरसुणी ४० तर, पन्नास रुपयांना मिळणारी मोठी केरसुणी पन्नास रुपयांवर पोहोचली आहे. कंगन, गजरा, डबल गजरा, तीन बांधी अशा विविध प्रकारच्या केरसुण्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

केरसुणीच्या पूजनाची प्रथा

धनाची देवता म्हणून आपल्याकडे प्राचीन काळापासून लक्ष्मीचे पूजन केले जाते. दिवाळीत केरसुणीला लक्ष्मीचा मान दिला जातो. अस्वच्छतेमुळे आरोग्य बिघडते अशात घराघरात वापरात येणारी केरसुणी घरा-घरात स्वच्छता ठेवण्यास उपयोगी येऊन कुटुंबीयांचे आरोग्य जपण्याचे काम करते. त्यामुळे तिला ‘लक्ष्मी’ म्हणूनही संबोधले जाते. दिवाळीतील ‘लक्ष्मी’ पूजनादिवशी या केरसुणीला ‘लक्ष्मी’ समजून तिची पूजा करण्याची परंपरा आहे.

नव्या पिढीचे व्यवसायाकडे दुर्लक्ष

केरसुणी बांधणे ही एक कला आहे. ही कला आत्मसात असलेल्या कुशल कामगाराची संख्या दिवसेदिवस कमी होत आहे. त्यातच हा व्यवसाय धारमाही चालत नाही. केवळ दिवाळीपुरता गाम असतो. त्यामुळे नवीन पिढी या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्न कमी होत असून ज्यामुळे दरवाढ होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

पावसाने नुकसान

सोमवारी मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे गोदाकाठी बसणाच्या केरसुणी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल दोन लाख केरसुण्या भिजल्याचा दावा किरकोळ विक्रेत्यांनी केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!