Skip to content

राज्यातील शाळा बंद न करण्यासंदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


नाशिक : राज्य सरकारने राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णयाला स्थागिती द्यावी, या मागणीसाठी आज सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी संघटनेने दिल्या निवेदनात असे म्हटले आहे, की वंचित मुलांच्या शिक्षणासाठी वाडी-वस्तीवर सुरु केलेल्या शाळा राज्य सरकारने पुन्हा एकदा बंद करायची प्रक्रिया सुरु केली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर पहिली ते पाचवी आणि तीन किलोमीटर अंतरावर सहावी ते आठवी हे वर्ग असले पाहिजेत, असे बंधनकारक असतानाही कुठलेही ठोस कारण नसताना राज्य शासन एका फटकऱ्यात यादी तयार करुन त्या शाळा बंद करत आहे, हा एकप्रकारे गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी पटसंख्येचे कारण पुढे करत ग्रामीण आणि दुर्गम भागातील मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक शाळा आहेत. तसेच अजूनही अनेक शाळा बंद करण्याच्या हालचालींना सुरुवात झालेली आहेत. शाळा बंद करण्याचा निर्णय हा ग्रामीण आणि दुर्गम भागातील मागास विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद करण्याचा एक भाग आहे. त्यातून विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणातून बाहेर फेकले जाईल, मुलींसाठी शिक्षण कायमचे दूर जाईल, असे अनेक धोके निर्माण होतील.

एकीकडे सरकार शिक्षण हक्क कायदा सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याची हमी देते. तर दुसरीकडे मात्र, या शाळा बंद करून एकप्रकारे सरकारच शिक्षण हक्क कायद्याचा भंग करत आहे. जेव्हा शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी असते, अशावेळी ते कर्तव्य पार पाडणे हे सरकारचे काम आहे. परंतु हे सरकार मात्र याच्या उलट दिशेने चालले आहे. तसेच पटसंख्या कमी असणे हा तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोष नसून तो प्रशासनाचा आहे. म्हणून समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये टिकवून ठेवण्यासाठी, राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याला त्वरित स्थगिती देऊन त्या अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने यावर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली आहे.

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी आयुक्त भागवत डोईफोडे यांच्याकडे या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पंकज परतवाघ, शीतल पाटील, विजय सुरसाळवे, हर्षद गजभिये, सागर जाधव, रोहन साळवे हे उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!