क्षितीज लोखंडे, द पाॅईंट नाऊ
नाशिक : प्रथेप्रमाणे दिवाळी सणाला शुक्रवारपासून जरी सुरुवात झाली असली. तरी परंपरेप्रमाणे उद्या (दि. २४) पासून लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता दिवाळीला अवघा एकच दिवस उरला असल्यामुळे नाशिककरांची आज मुख्य बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे.
गत दोन वर्षी कोरोनामुळे दिवाळी सणाला काही मर्यादा आल्या होत्या. पण यंदा निर्बंधमुक्त वातावरणात दिवाळी साजरी होणर असल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. त्यामुळेच शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा व मेनरोड परिसरात गेल्या आठवड्यापासून खरेदीने बाजारपेठ फुलली आहे. पण गेल्या शुक्रवार व शनिवार मात्र, तर बाजारपेठेत पाऊल टाकायलाही जागा नाही, इतकी गर्दी होती. त्यामुळे उद्या शेवटचा दिवस असल्याने बाजारपेठ तुडूंब भरलेली असणार आहे. ही गर्दी सोमवारपर्यंत पाहायला मिळणार आहे.
मेनरोड परिसरात नवीन कपडे, चपला-बूट, तसेच फराळासाठी लागणारा किराणा सामान, आकाशकंदील, एलईडी लाईट, लक्ष्मीपुजेसाठी लागणारे साहित्य व अन्य सजावट आदींची दुकाने थाटली आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी असून लोकांना दुकानांमध्ये व रस्त्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही, इतकी गर्दी आहे. यावेळी गेल्या दोन दिवसांपासून तर शहरातील अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होत असून अनेक जण बाजारपेठेबाहेर वाहने लावत असल्या, तरीसुद्धा काही वाहनचालक आपली वाहने या रस्त्यांवर आणत असल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. केवळ नागरिकच नाही, तर व्यावसायिकही त्रासले असून ते आपापल्यापरीने कोंडीला आवर घालत आहेत. शहरातील मेनरोड, भांडीबाजार, भद्रकाली, सीबीएस, रविवार कारंजा आदी भागात मोठी गर्दी होत आहे.
पोलिस केवळ बॅरिकेड्स लावून मोकळे
यावेळी जेव्हा बाजारपेठांमध्ये गर्दी होत असते, तेव्हा शहर पोलिसांनी काहीतरी ठोस उपाय करणे गरजेचे असते. पण त्यातही पोलिसांनी असमर्थता दर्शवली असून केवळ मुख्य बाजारपेठेंमध्ये जाणारे रस्त्यांना बॅरिकेड्स लावून आपले सोपस्कार पार पाडण्यात धन्यता मानली आहे. या रस्त्यांवर जरी वाहनबंदी असली, तरी नागरिक आपली वाहने दुमटत असूनही पोलीस साफ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अनेक नागरिक व व्यावसायिकांनी पोलिसांच्या या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम