सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | येथील देवळा बसस्थानकात शुक्रवार (दि .१) रोजी लालपरीचे अर्थात एसटीबसचे व चालक-वाहकांचे पूजन करत अनोखे लक्ष्मीपूजन साजरे केले. ज्या बससेवेमुळे बसस्थानकांमध्ये रोजगार व व्यवसाय उपलब्ध होतो. त्या एसटीबसलाच लक्ष्मी मानत येथील व्यावसायिकांनी मनोभावे बसचे पूजन केले. यावेळी देवळा बसस्थानकात आलेल्या देवळा-कळवण या बसचे पूजन येथील सप्तश्रृंगी जनरल स्टोअर्सचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दादाजी आहेर व रोहिणी आहेर या दाम्पत्याने केले. राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त कीर्तनकार संजय नाना धोंडगे, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, सटाणा आगारप्रमुख राजेंद्र आहिरे, सुनील वाकचौरे, मंगेश ठाकूर, वाहतूक नियंत्रक भूषण आहेर, राजेश चव्हाण, यांच्यासह चालक-वाहक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
एसटी बसला सजवून लक्ष्मीपूजन करण्यात आले
या बसस्थानकातून नाशिक, नगर, सटाणा, नंदुरबार, कळवण, सप्तश्रृंगी गड, मालेगाव, धुळे, कोल्हापूर, पुणे अशा अनेक बसेसची रोज ये-जा चालू असते. यामुळे प्रवाशांची येथे नेहमीच वर्दळ असल्याने येथील लहानमोठ्या सर्वच व्यावसायिकांना विविध व्यवसाय करता येतात. या पार्श्वभूमीवर एसटीबसबद्दल कृतज्ञता व्यक्त करत व बससेवेलाच लक्ष्मी मानत हे लक्ष्मीपूजन करण्यात आले. एसटीबसला नारळाच्या झावळ्यांनी व फुलमाळांनी सजवत आणि पूजन करून फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीसपाटील हिरामण गांगुर्डे, रोहित आहेर, अक्रम तांबोळी, रोशन खैरणार, कैलास बागुल, संजय खैरे, भूषण आहेर, गणेश देवरे, जय निकम, करण शिरसाठ, सोमनाथ कानडे आदी कार्यकर्ते, व्यावसायिक व प्रवाशी उपस्थित होते.
खरे तर जनसामान्यांसाठी वाहतुकीचे सुरक्षित व सुलभ साधन म्हणून एसटीकडे पाहिले जाते. आणि तरीही एसटीबसला टोलनाक्यावर टोल भरावा लागतो हे मला अयोग्य वाटते. त्यामुळे एसटी बसला टोल माफ व्हावा अशी मागणी रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे संजयनाना धोंडगे यांनी यावेळी सांगितले.
Deola | प्रदूषणमुक्त सण व उत्सव साजरे करा; मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर
मंडळाच्या वतीने प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी येथील बसस्थानकावर सेल्फी पॉईंट वर ‘मी मतदान करणार-आपण पण करा’ असे सांगत राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
“प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या बसचा असे अनोखे पूजन एसटीचा सन्मान वाढवणारे आहे. पुढील काही दिवसांत सटाणा आगाराला नव्याकोऱ्या बसेस मिळणार असल्याने एसटी बद्दलची नाराजी दूर होऊन एसटी गतिमान होईल यात शंका नाही.” – राजेंद्र आहिरे ,सटाणा आगारप्रमुख.
“बसस्थानकातून आम्हा सर्व व्यावसायिकांना रोजगार व व्यवसाय मिळतो. आमच्यासाठी एसटीबस आणि त्यातील प्रवासी आमचे दैवत तर बसस्थानक हे मंदिरासमान आहे. येथील स्वच्छता, सुरक्षितता जपण्यासाठी आम्ही कायम दक्ष असतो.” -दादाजी आहेर, व्यावसायिक देवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम