सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | हनुमंतपाडा ता. देवळा येथे रविवारी दि. १३ रोजी पूरपाण्यात वाहून गेलेल्या संजय रणधीर (५०) या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल पाचव्या दिवशी बुधवार दि. १६ रोजी सकाळी सहा वाजता वार्शी गावातील पाझर तलावात आढळून आला. रणधीर यांचा मृतदेह आढळून आल्याचे समजताच घटनस्थळी गावकऱ्यांसह नातेवाईकांनी धाव घेतली. रविवारी याठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी येथील शेतकरी संजय काशिनाथ रणधीर (५०) हे रविवार (दि.१३) रोजी वार्षि – हनुमंतपाडा रस्त्यावरील फरशी पुलावरून घरी जात असताना गवानजीकच्या कोलती नदीच्या पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
मागील तीन दिवसांपासून शोध सुरू होता
गेल्या तीन दिवसांपासून या नदीपात्रावरील पाझर तलाव व केटीवेअरमध्ये शोध मोहीम राबवून देखील त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने हनुमंत पाडा व खर्डे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. रणधीर यांना शोधण्यासाठी मालेगावच्या अग्निशमन दलाचे पथकाने जिकरीचे प्रयत्न केले होते. मात्र त्यांना देखील यश न आल्याने ग्रामस्थ व कुटुंबियांना या घटनेची चिंता लागून राहिली होती. आज बुधवार दि. १६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील पोलीस पाटलांना सदर मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आल्याने त्यांनी तात्काळ याची माहिती देवळा पोलिसांना गावातील नागरिकांना दिली.
Deola | देवळा येथे चित्रा वाघ यांच्या निवडीचे स्वागत
शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जागेवर रणधीर यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येऊन अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी खासदार भास्कर भगरे, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी भेट देत घटनेचा शोक व्यक्त केला. देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रणधीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम