देवळा : दिव्यांगांच्या कलेला प्रोत्साहन देणे व समाजाप्रती आपण काही देणे लागतो हे संस्कार रुजविण्याचे काम अशा प्रदर्शनांद्वारे होत असते असे प्रतिपादन देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी केले.

देवळा एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात निवासी अपंग कल्याण केंद्र सटाणा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध आकारातील मेणबत्त्या, पणत्या, तुळशी वृंदावन आदी वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते . या प्रदर्शनाचे उदघाटन प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते . या प्रदर्शनास व विविध वस्तूंच्या खरेदीसाठी जिजामाता कन्या विद्यालय व शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल तसेच कर्मवीर रामरावजी आहेर जुनियर व सीनियर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला .
डॉ.मालती आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा येथील निवासी अपंग कल्याण केंद्र शाळेतील दिव्यांग विध्यार्थ्यानी बनविलेल्या पणत्या व मेणबत्या एक सामाजिक कर्तव्य म्हणून स्वनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन देवळा एज्युकेशन सोसायटी च्या प्रांगणात घेण्यात आले. या कार्यक्रमास निवासी अपंग केंद्राचे शिक्षक वळवी सर, पवार सर, दिनेश सोनवणे , विद्यार्थी नरेश वळवी, स्वप्निल चौधरी,राणी गोसावी, माधुरी जाधव उपस्थित होते.आपल्या जीवनात आपण सर्वांनी दिव्यांग बंधू भगिनींच्या पाठीशी एक सामाजिक कर्तव्य भावनेतून उभे राहून मदत करावी असे प्रतिपादन डॉ.मालती आहेर यांनी याप्रसंगी केले. मुख्याध्यापिका पी. डी.सागर, मुख्याध्यापक दिलीप आहेर, उपप्राचार्य बी के रौंदळ व सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम