Skip to content

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार ; लटकेंचा मार्ग सुकर, ‘राज’शिष्टाई की भाजपाला पराभवाची भीती ?


मुंबई : भारतीय जनता पक्षाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनखुळे यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, त्यांच्या या माघारीमुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या माघारी नंतर चर्चांना उधाण आले आहे. भाजपाला पराभव दिसत असल्याने हे घडवून आणल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तसेच शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही तशीच मागणी करत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर काल रात्रीपासून सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीत यावर अनेक नेत्यांशी चर्चा केली होती. तसेच आज सकाळी केंद्रीय सचिव आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी आणि देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार आणि या निवडणुकीशी संबंधित लोकांशी चर्चा केल्यानंतर अखेर भाजप पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला असून ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा आहे.

तसेच, झालेल्या बैठकीत मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून उभे राहणार नसल्याचेही त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेतला असून अर्ज माघारीनंतर त्यांनी ऋतुजा रमेश लटके यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपल्यावर कोणताही दबाव नसुन पक्षाच्या आदेश पाळणार असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी दिली आहे.

याआधी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके यांनी मुरजी पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, त्यांच्या आकस्मिक निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची घोषणा झाली. तेव्हा ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती.

दरम्यान, या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा महापालिकेकडून मंजूर कण्यात अडचणी येत होत्या. शेवटी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांचा राजीमाना मंजूर करण्यात आला. त्यानंतरही लटके यांच्यावर आरोप करण्यात आले. पण काल राज ठाकरे, शदर पवार आणि प्रताप सरनाईक यांच्या आवाहनानंतर भाजपने अखेर या निवडणुकीतून माघार घेतली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!