Skip to content

मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष; भाजपविरोधात घोषणाबाजी


मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घातला आहे.

भाजप पक्षश्रेष्ठींनी या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद अंधेरीत दिसून आले. यावेळी मुरजी पटेल यांच्या काही कार्यकर्त्यांना आपल्या भावना अनावर झाल्यात. तर काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. निवडणूक कार्यालयाजवळ हा गोंधळ झाला.

यावेळी पक्षश्रेष्ठींनी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे मुरजी पटेल यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी मुरजी पटेल यांचे अंधेरी एमआयडीसी परिसरात असलेल्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भाजप समर्थक कार्यकर्ते जमा झाले आहेत. यावेळी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घालत भाजपविरोधात घोषणाबाजी केली आहे. काही कार्यकर्त्यांनी तर अपशब्दांचा वापर केला.

दरम्यान, मुरजी पटेल यांनी अंधेरीतील निवडणूक कार्यालयात दाखल होत आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर पटेल यांनी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना गुंगारा देत बाहेर पडले होते. सध्या मुरजी पटेल हे भाजपच्या दादर कार्यालयात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला निवडणूक लढवायची नव्हती तर त्यांनी अर्ज का दाखल करायला सांगितला, असा सवाल उपस्थित केला आहे.

मागील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला दिल्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून लढले होते. त्यावेळी शिवसेनेच्या रमेश लटके यांनी त्यांचा १६ हजार मतांनी पराभव केला. पण, रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. यंदा मुरजी पटेल हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, भाजपने निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पटेल यांच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!