Rahul Aaher | राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून नाशिकच्या चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर व नाफेडचे संचालक केदानाना आहेर या दोन भावांमध्ये उमेदवारी वरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. अशातच आमदार राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. पत्रकार परिषद घेत राहुल आहेर यांनी ही घोषणा केली आहे.
चांदवड-देवळा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच
गेल्या दोन पंचवार्षिकांपासून चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात डॉ. राहुल आहेर हे भाजपाचे आमदार आहेत. परंतु यावर्षी तिकिटासाठी या भागात त्यांना त्यांचे बंधू, नाफेडचे संचालक व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्यामध्ये उमेदवारीवरून राजकारण रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदा नाना आहेर यांनी जोरदार तयारी सुरू करत मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे. त्याचबरोबर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गावागावातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आहेर भावांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती.
डॉ. राहुल आहेर मध्य नाशिक मधून लढणार
अशातच डॉ. राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत चांदवड-देवळा मतदार संघातून माघार जाहीर केल्याने केदा आहेरांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच राहुल आहेर यांनी पक्षाला केदा आहेराना उमेदवारी देण्याची वरिष्ठांकडे मागणी देखील केली आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल आहेर मध्य नाशिक मधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम