नाशिक – महाविकास आघाडीने राज्यात फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आणला होता. मात्र, सध्याच्या सरकारच्या निष्कर्तेपणामुळे आज राज्यातले उद्योग बाहेर जात आहे. उद्या मुंबई जर गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
नाशिकमध्ये आयोजित काँग्रेस ओबीसी आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र मंथन शिबीरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत हाेते. यावेळी कॉंग्रेसचे ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅ. अजयसिंग यादव व पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. ते म्हणाले, सध्याच्या जीएसटी कायद्याने सामान्य लोकांना लुटले जात आहे. त्यामुळे एक माणूस आता देशात श्रीमंत व्हायला निघाला आहे. जर देशात उद्या युद्ध झाले तर हेच विश्वगुरू बँकेत ठेवलेला तुमचा पैसा घेऊन जातील. तसेच फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेत म्हणाले, की गुजरात पाकिस्तान आहे का हे त्यांनी त्यांचे ठरवावे मात्र आमचे उद्योग इतरत्र जाऊ नये.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सध्या देशात संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. देशातील लोकशाही, माध्यमे भाजपमुळे धोक्यात आणली आहे. त्यासाठी सध्या समाजाच्या प्रमुख लोकांसह चर्चा करून हे मंथन करण्याचे काम सुरू असून संविधान वाचविण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी तसेच ओबोसीनी एकत्र येणे आवश्यक आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण स्वातंत्र्यानंतर देशात अनेक अडचणी उभा राहिल्या, तेव्हा काँग्रेसने अडचणी सोडवल्या व देशातील लोकशाही टिकवली. तसेच, जाती धर्मातील विखुरलेला देश काँग्रेसने एकत्र संघटित केला. मात्र आज भाजपने अनेक जातींमध्ये भांडणे लावली, धर्मांमध्ये फुट पाडली. त्यामुळे देशाची लोकशाही डोक्यात आणली. तसेच माध्यमांची गळचेपी करून देशात प्रशासकीय यंत्रणा आपल्या तालावर नाचवली. यामुळे जर देशात असेच सुरु राहिले तर, एक दिवस देशात अराजकता निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.
यावेळी पटोले हेही म्हणाले, जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकतो, परंतु या कांद्यांना काय भाव आहे. ह्यांमुळे शेतकऱ्यांचा अनेकदा खर्च ही निघत नाही. शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे कारनामे ह्या सरकारकडून होत आहेत. तसेच, नाशिक हे धर्माचे आणि क्रांतीचे स्थान असून अन्यायाविरुध्द लढण्याची ताकद या जिल्ह्यात असल्याचे यावेळी पटोले म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम