Murder news: नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याची घटना इंदिरानगर भागातील पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर चौक यशवंत नगर या ठिकाणी सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दादाजी गवळी (४१) रा. समृद्धी प्लाझा यशवंत नगर, दामोदर चौक पाथर्डी फाटा ( मुळ गाव साक्री. जि. धुळे) यांचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या कारणावरून पत्नी व त्यांच्यात नेहमी भांडण होत असत. मध्यंतरी दोघांमध्ये वाद मिटवण्यात आले होते. मात्र त्यांची पत्नी संशयीत आरोपी सुनीता गवळी (४०) व त्यांचा मुलगा निशांत गवळी (२०) यांनी तो राग मनात धरून सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बेडरूम मध्ये गाढ झोपे असलेले मयत दादाजी गवळी यांच्या डोक्यात मुसळीने जोरदार प्रहार करत त्यांचा निर्दयपणे खून केला. दरम्यान सदरची माहिती मिळताच पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा शिंदे यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. मयत दादाजी गवळी हे अंबड औद्योगिक वसाहतीत एका खाजगी कंपनीत कामाला होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, असा परिवार आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत अधिक तपास करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम