Skip to content

Lalit Patil | इकडे ललित पाटील अटकेत; तिकडे अंधारेंनी दुसऱ्या नेत्यावरही केले आरोप


Lalit Patil | ड्रग्ज माफिया ललित पाटीलला आता बेड्या ठोकल्यानंतर त्याने गौप्यस्फोटांची मालिका सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मी पुण्यातील ससुन हॉस्पीटलमधुन पळालो नाही तर मला पळवलं गेलं असा स्फोटक दावा ललित पाटील याने केला आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते.  ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर आता ललित पाटीलच्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळत आहे.

ललित पाटीलला पळवून लावण्यात राज्यातील राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसह मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करावी. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करावी, अशीदेखील मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

सुषमा अंधारेंनी यापूर्वी केलेले आरोप काय ?

दरम्यान, ड्रग्स माफिया ललित पाटील ससून रुग्णालयामधुन पळून गेल्यानंतर नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात मंत्री दादा भुसेयांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचादेखील समावेश आहे, असा दावा नेत्या सुषमा अंधारेंनी 13 ऑक्टोबरला केला होता. या दोन्ही मंत्र्यांची नावे लवकरच पुढे आणू असंही सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा आणि पुरावे लवकरच समोर आणणार, असा दावाही सुषमा अंधारेंनी केला होता.

रवींद्र धंगेकरांचे आरोप काय ? 

दरम्यान, काँग्रेसचे पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सर्वात आधी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ससून ड्रग्ज प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या पळून जाण्यामागे राज्यातील मंत्र्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. पण सुषमा अंधारे यांनी धंगेकरांच्या आरोपानंतर थेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेतलं होतं.

Israel Hamas War: इस्रायलविरोधात जगभरातील मुस्लिम एकवटले, सौदीत ५७ देशांची तातडीची बैठक

दादा भुसे नेमकं काय म्हणाले होते?

आज जे घाणेरडे आरोप माझ्यावर केले आहेत ते पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सुषमाजी अंधारे यांनी जे आरोप केलेत ते त्यांनी सिद्ध करावेत अन्यथा मालेगावच्या जनतेची माफी मागावी आणि असे झाले नाही तर कायदेशी कारवाई करु. ड्रग्सबाबत काही दिवसांपूर्वी माहिती मागवली होती त्यानुसार शहरात पोलिस कारवाई होते आहे. काहीवेळा बाहेरील टीम बोलवून कारवाई करावी लागते. याचा अर्थ स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही असं होत नाही. येत्या काही दिवसात अजून अवैध धंद्यांवर कठोर कारवाई होईल. अवैध धंदा चालकांना पाठीशी घातले जाणार नाही.मग तो कुठल्याही पक्षाचा असो अथवा कुणीही असो त्याच्यावर काठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसात विशेष पथकांच्या माध्यमातून इतर अवैध धंद्यांवर देखील टाच आणली जाईल. असं मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत.

ललित पाटीलने केला गौप्यस्फोट

दरम्यान, ड्रग्स माफिया ललित पाटील याला बंगळुरुत बेड्या ठोकून पोलिसांनी त्याला मुंबईत आणले. त्यानंतर ललितला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेताना, ललित पाटीलने माध्यमांसमोर मोठे दावे केले. ‘मी पळालो नाही तर  मला पळवण्यात आलं. याप्रकरणात कुणाकुणाचा हात आहे,  हे मी लवकरच सांगणार’ असं ललित पाटील म्हणाला आहे.

ललित पाटीलला ठोकल्या बेड्या 

ड्रग्स माफिया ललित पाटील हा श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी 3 पथके तयार केली होती. पुणे पोलिस ललितच्या मागावर असताना साकीनाका पोलिस ललित पाटीलसाठी सापळा रचत असताना साकीनाका पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात  ललित पाटील अलगद जाळ्यात अडकला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!