Vidhan Parishad Election | 27 जुलैला विधान परिषद सभागृहातील 11 आमदारांचा कार्यकाळ संपणार असल्याने आज या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात असल्याने एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे आता कोणत्या उमेदवाराचे बारा वाजणार.? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मतांची फाटाफुट होण्याची आणि आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व पक्षांनी याबाबत खबरदारी घेतली असून, आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठवले आहे. (Vidhan Parishad Election) या निवडणुकीत महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार मैदानात असून, महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी केंबर कसली आहे.
Vidhan Parishad Election | काँग्रेसच्या आमदारांची मतं फुटणार..?
या निवडणुकीत मतांची फाटाफुट आणि आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन व ‘सूरत वाया गुवाहाटी’चा धसका घेऊन भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटाने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाकडून प्रत्येकी 1 तर, शेकापचे नेते जयंत पाटील हे उभे असून, त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसचे 3 ते 4 आमदार हे क्रॉस वोटिंग करणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. हे आमदार फक्त कागदोपत्री काँग्रेसमध्ये असून, आम्ही त्यांना मोजतच नाही आणि ते काँग्रेसमधील डाऊटफुल आमदार कोण हे आम्हाला माहीत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. तर, त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल अशी ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली. (Vidhan Parishad Election)
भाजपकडून पराभूत उमेदवारांना संधी तर, ठाकरेंकडून निष्ठेचे फळ
दरम्यान, या निवडणुकीत भाजपने लोकसभेत पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे ठरवले असून, त्यांनाही या निवडणुकीत उतरवले आहे. त्यासोबतच मित्रपक्षालाही संधी दिली असून, सदाभाऊ खोत यांनाही उमेदवारी दिली आहे. यासोबतच भाजपकडून परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर असे एकूण पाच उमेदवार उभे केले आहे.
शिंदे गटाकडून यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी यांना संधी दिली असून, कृपाल तुमणे यांना उमेदवारी दिली आहे. तर, अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे मैदानात आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाने समर्थन दिले असून, शिवसेना ठाकरे गटानेमिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवले आहे.
कोणाला किती मतांची जुळवाजुळव करावी लागणार..?
या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने 1 उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागणार आहे. यासाठी मतांची आकडेमोड जाणून घेऊयात…
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे मिळून एकूण 65 आमदार असून, पाठिंबा देणाऱ्या पक्षांसह एकूण 71 आमदार सध्या मविआकडे आहे. महायुतीला 4 ते पाच मतांची गरज आहे. तर, महायुतीकडे एकूण 201 आमदारांचा पाठिंबा असून, महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे आता एकूणच गणित हे अपक्ष आमदारांवर अवलंबून असणार आहे. (Vidhan Parishad Election)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम