Skip to content

येत्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून वणी सप्तश्रृंगीगड भाविकांसाठी खुले होणार


नाशिक – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेले वणीच्या सप्तश्रृंगी मातेच्या नवरूपाला डोळ्यात साठवण्यासाठी आसुसलेल्या भाविकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या नवरात्रोत्सवातील पहिल्या माळेपासून सप्तश्रृंगीगड भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा कळवणचे प्रांताधिकारी विकास मिना यांनी दिली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेले मातेच्या मूर्तीवरील शेंदूर लेपन काढण्याचे काम पूर्ण झाले असून, सर्वच भक्तांना मूळ स्वरूपातील देवीच्या दर्शनाची आस लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मातेचा मुखदर्शन सोहळा पार पाडला होता.

नवरात्रोत्सवाच्या पूर्व तयारीच्या संदर्भात प्रांताधिकारी मिना यांच्या अध्यक्षतेखाली सप्तश्रृंगीगड देवस्थान ट्रस्ट, रोपवे प्रशासन, ग्रामपंचायत व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक सप्तश्रृंगीगडावर सोमवारी पार पडली. ह्यात त्यांनी नवरात्रोत्सव काळात नांदुरी ते सप्तश्रृंगीगड मधील वाहतुकीसाठी सुस्थितीत असलेल्या व नव्या बसेसचाच वापर करावा, पायवाटेवर आरोग्य सुविधा, ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट उभारणे तसेच भाविकांसाठी यात्रा सुरू होण्याआधी हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करणे अश्या महत्त्वाच्या सूचना दिल्या.

तसेच, यात्रोत्सवात प्लॅस्टिक बंदीचे नियमांचे पालन व्हावे, ग्रामपंचायतीने भाविकांसाठी शुद्ध पाणी पुरवावे, घाट रस्त्यावरील खड्डे बांधकाम विभागाने त्वरित बुजवावे, यात्राकाळात दोन अतिरिक्त रुग्णवाहिका गडावर उपलब्ध कराव्यात आणि ठिकठिकाणी आवश्यक मेडिकल चेकअप कॅम्प सुरू करावेत, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले. याकाळात गडावर अतिक्रमण केल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीला पोलिस उपअधीक्षक अमोल गायकवाड, निरीक्षक समाधान नागरे, तहसीलदार बंडू कापसे, बीडीओ पाटील, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अॅड. ललित निकम यांच्यासह सप्तश्रृंगीगडाचे सरपंच रमेश पवार, अजय दुबे, संदीप बेनके आदींसह ग्रामस्थ, सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!