राखीव जंगलातील वृक्षांवर कुऱ्हाडीचा घातला जातोय घाव

0
3

द पॉईंट नाऊ: पांडवलेणी येथील राखीव वनात लाकूडफाटा गोळा करण्याच्या उद्देशाने काही महिलांकडून घुसखोरी केली जात आहे. या महिला केवळ लाकूडफाटा गोळा करतात असे नाही, तर सर्रासपणे कोयते चालवून झाडांची तोड करत फांद्यांच्या मोळ्या बांधून फरार होत असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

पांडवलेणीच्या डोंगराचा परिसर सध्या हिरवाईने बहरला आहे. येथील झाडांची दमदार वाढ झाली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानासह आजूबाजूला असलेल्या डोंगरावरील झाडोरा हे राखीव वन आहे. वनविकास महामंडळाच्या अखत्यारीत या वनाचा समावेश होतो. खतप्रकल्पाच्या बाजूने तसेच वनोद्यानाच्या पाठीमागून गरवारेच्या संरक्षक कुंपणापासून न लाकूडतोड्या महिलांची टोळी – सातत्याने दररोज येथे घुसखोरी करते. या वनात कुऱ्हाडबंदीचा नियम हा पूर्णपणे शिथिल झालेला दिसून येतो. कारण या महिलांकडून कुऱ्हाड व कोयते चालवत केवळ झाडांचे फुटवे नव्हे तर सर्रासपणे झाडेच तोडली जात आहेत.

तोडलेल्या झाडांच्या माध्यमातून मिळणाऱ्या फांद्याचा पालापाचोळा छाटून त्याच्या मोळ्या करत महिला येथून फरार होत असल्याचे काही नागरिकांनी जॉगिंग व ट्रेकिंग करताना बघितले आहे. या राखीव जंगलाचे क्षेत्र हे वनविकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. यामुळे या जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी ही महामंडळावर असून, या ठिकाणी वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सांगितले.

या लाकूड तोडीमुळे वनोद्यानातील वन्यप्राणी, पक्ष्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता वाढीस लागली असून त्यामुळे या डोंगराचे सौंदर्यही बाधीत होत आहे.

… तर होईल अनर्थ

● पांडवलेण्यांच्या राखीव बनात बिबट्या, तरस यांसारख्या वन्य प्राण्यांसह विविध विषारी सरपटणारे प्राणीदेखील आहेत. सध्या पाऊस सुरु असल्याने या जंगलात दाट गवत वाढलेले आहे.

● यामुळे घोणससारख्या विषारी सर्पांचा देश अथवा बिबट्या, तरससारख्या वन्यप्राण्यांकडून लाकूडतोड्या महिलांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही काही वन्यप्रेमींनी सांगितले.

● यामुळे महिलांनी या बनात लाकूडतोडीसाठी घुसखोरी करू नये, असे आवाहन सामाजिक संघटनांसह वनविकास महामंडळाने केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here