अहमदनगर/नाशिक : अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे भाऊबीजेनिमित्त माहेरी आलेली नाशिक येथील बहिण व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे.
अर्चना जगदीश सोनवणे (वय ३५, रा. वणी, नाशिक) व राणी शरद शिंदे (वय १८, रा. म्हसरूळ, नाशिक शहर) असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या बहिण व भाचीची नावे आहेत. कोपरगावमधील कान्हेगाव येथे राहत असलेल्या मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे भाऊबीजेनिमित्त या ३ बहिणी व त्यांची मुले मामाच्या गावी आली होती.
आज सकाळी भाऊबीज आटोपून या बहिणी व भाच्या घराजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी ११ च्या सुमारास धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अर्चना सोनवणे यांचा मुलाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो काठावरून पाय घसरून पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली होती.
दरम्यान, अर्चना यांच्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यांनी दोघांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली, असे एकूण पाच जण नदीत बुडत असतांना मामाचा मुलगा मंगेश चव्हाण (वय १४) याला ३ जणांना वाचवण्यात यश आले. पण आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे.
यावेळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात या दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. याबाबत कोपरगाव ग्रामीण ठाण्यात त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांचे पथक करत आहे. दरम्यान, ऐन भाऊबीजेच्या दिवशी या दोघी मावशी-भाचीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम