नाशिक : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेने आज शालीमार येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केलीत. यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेकडो संतप्त शिवसैनिकांनी एकत्र येत रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांचा निषेध व्यक्त केला.
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोली येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यभरातील अनेक शिवसैनिक संतापले होते. नाशिकमध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळाले असून आज शिवसैनिकांनी त्याचा निषेध केला आहे.
रामदास कदमांनी दापोली येथील सभेत उद्धव ठाकरेंवर टीका करताना मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल ? तुम्हाला शंका आहे का, असे म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत, असेही ते म्हणाले होते.
त्यांच्या याच वक्तव्यावरून राज्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे कदमांच्या निषेधार्थ आज शहरातील शालीमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध नोंदवला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी नगरसेवक अजय बोरस्ते, विलास शिंदे, शिवसेना नेते सुनील बागुल यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम