Skip to content

मोठी बातमी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश !


नाशिक – आताची सगळ्यात मोठी बातमी आली आहे शिंदे गटातून. शिवेसेनेचे माजी नगरसेवक व म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण (बंटी) तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये आता शिंदे गटाची नांदी झाली आहे.

दरम्यान असेही सांगितले जाते की, तिदमे यांना शिंदे गटाचे महानगरप्रमुखपदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री दादा भुसे, सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यानंतर बंटी तिदमे यांचा प्रवेश हा शिंदे गटातील शहरातला पहिला मोठा प्रवेश मानला जात आहे.

काल बंटी तिदमे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्याचदरम्यान त्यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, योगेश म्हस्के व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, तिदमेंच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. कारण, जिल्ह्यातील अनेक मोठे नेते शिंदे गटात जाऊनही नाशिक शहरातून कुठलाही पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहत शिवसेनेप्रती आपली निष्ठा जोपासली होती.

मात्र, आता तिदमे यांच्या शिंदे गटातील उघड प्रवेशानंतर संघटनेतील अनेक पदाधिकारी व शिवसेनेचे आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनीही शिंदे गटात जाण्याच्या निर्णय घेतला आहे. तसेच काहींनी तर ज्या गटाकडे धनुष्यबाण चिन्ह जाईल त्या गटासोबत जाण्याची भूमिका त्यांनी खासगीत बोलून दाखवली आहे. त्यामुळे लवकरच नाशिक महापालिकेत शिंदे गटही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!