Sexual assault on five minor girls : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये असलेल्या एका वस्तीगृहामध्ये पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. यातच आणखी एक संताप प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या मुलींच्या वस्तीगृहातील पाच अल्पवयीन बालिकांवर वस्तीगृहात काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित याने पाचही अल्पवयीन मुलींसोबत ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ दरम्यान वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून अनैसर्गिक संभोग केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश शिवाजी पंडित हा सदर वस्तीगृहामध्ये काळजीवाहक म्हणून काम बघत होता. ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ दरम्यान गणेश पंडित याने पाचही बालिकांसोबत लैंगिक छळवणूक करून अनैसर्गिक संभोग केला. याबाबत या मुलींनी संस्थेचे अधीक्षक व सचिव यांना माहिती दिली. मात्र संस्थेकडून गणेश पंडित याच्यावर कोणतीही कारवाई न करता माहिती लपवून ठेवण्यात आली.
पीडित मुली बालगृहात प्रवेशित असताना त्यांच्यासोबत गणेश पंडित यांनी लैंगिक अत्याचार केल्याबाबत लेखी तसेच व्हिडिओ शूटिंग स्वरूपात माहिती बालकल्याण समिती जळगाव यांना पीडित बालिकांसोबत प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून प्राप्त झाल्यानंतर, समितीमार्फत सदर संस्थेचे सचिव आणि अधीक्षक यांना विचारणा करण्यात आली. या दरम्यान त्यांना याबाबत माहिती असून देखील त्यांनी यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी व्हावी म्हणून एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी पीएसआय शरद बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडित, सचिव भिवाजी दीपचंद पाटील आणि अधीक्षक महिलेवर भा.द.वी कलम ३५४, ३७६(२) (ड) (एन) (क), ३७७, पॉस्को कलम ३,४,५,६,७,८,९,१०,१२,१९,२१, सह अनुसूचित जाती व जमाती कायदा कलम ३ (१) (अ) (ई) (व्ही) (डब्लू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम