Skip to content

Nashik update : नाशकात अन्न व औषध विभागाची कारवाई ; हे दुकान केले सील


Nashik update  अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसंदर्भात कडक धोरण स्वीकारले असून, याअंतर्गत गुरुवारी (दि. 27) अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आडगाव परिसरातील देवी खंडेराव मंदिरासमोर, आडगाव येथील मे. महालक्ष्मी ट्रेडर्सचे मालक प्रशांत कचरू सावळकर (वय 35 ) यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी या पेढीची झडती घेतली असता 2675 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळला.

तसेच पुढील तपासणीत त्यांच्या गाडी क्रमांक एमएच 15 एचजी 1699 मध्ये 45 हजार 782 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यापाठोपाठ त्यांच्या राहत्या घराच्या झडतीत 10 हजार 4280 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आढळून आला. असा एकूण 1 लाख 52 हजार 744 रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. त्यात विमल पानमसाला, हिरा पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल 717 सुगंधित सुपारी व्ही. वन. सुगंधित सुपारी नखरेली स्वीट सुपारी आदींचा समावेश आहे.

या साठ्यासह सुमारे दोन लाख रुपये किमतीचे वाहन क्रमांक एमएच 15 एचजी 1699 हे अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार यांनी जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, तसेच दुकान सील बंद केले आहे. या प्रकरणी प्रशांत कचरू सावळकर याने बंदी असताना गुटखा पानमसाला सुगंधीत तबाखु व तत्सम पदार्थांची साठवणूक केल्याने आडगाव पोलीस स्टेशन येथे भा. दं.वि. कलम 188 272, 273 व 328 अंतर्गत त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.

सदरची कारवाई सहआयुक्त (अन्न) सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उ. सि. लोहकरे, मनिष सानप सहायक आयुक्त (अन्न) तसेच सर्व अन्न सुरक्षा अधिकारी गोवि कासार, अमित रासकर, प्रमोद पाटील, अविनाश दाभाडे व श्रीमती सु. दे. महाजन यांच्या पथकाने केली.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!