Skip to content

दिवाळी सुट्टीतील परतीचा प्रवास सुरू


द पॉईंट नाऊ:  दिवाळीच्या सुट्टीत गावी गेलेले आणि परगावातून नाशिकला सुटी घालविण्यासाठी आलेल्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांच्या गर्दीने गाड्या देखील फुल्ल झाल्या आहेत. ठक्कर बझार आणि महामार्ग बसस्थानकात गर्दीमुळे धावपळही होत आहे.

कोरोनामुक्तीमुळे यंदा दिवाळी सुट्टीची सर्वत्र धूम दिसून येत आहे. दिवाळी सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदरपासून गाड्यांची गर्दी वाढली होती. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात आल्याने महामंडळाने दहा दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतरही प्रवाशांचा प्रतिसाद कायम असून परतीच्या प्रवासापर्यंत बसेसला गर्दी वाढत आहे. दिवाळीची सुटी घालविण्यासाठी गावी गेलेले कुटुंबीय नाशिकला परतू लागले आहेत. तर नाशिक मुक्कामी आलेले परजिल्ह्यातील प्रवासीदेखील आता माघारी जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. नवीन मध्यवर्ती बसस्थानक तसेच मुंबईनाका येथील महामार्ग बसस्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. महामार्ग बसस्थानकातून मुंबईकडे प्रवासी वाहतूक केली जाते उर्वरित वाहतूक नवीन मध्यवर्ती बसस्थानकातून केली जाते. या दोन्ही ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

गर्दीचा फायदा; चोरट्यांची दिवाळी

महामार्ग आणि नवीस सीबीएस बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पाकीट आणि साहित्य चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याचा अनुभव प्रवाशांनी कथन केला. महामार्ग स्थानकातून अनेकांचे पाकीट मारले गेल्याची तक्रार मुंबईनाका पोलिसांत दाखल झाली आहे. विशेषत: रविवारी अशाप्रकारच्या चोरीच्या घटना अधिक घडल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!