Skip to content

रावसाहेब नावाचा दिलदार माणुस ! काळाच्या पडद्याआड


साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. काल साेशल मिडीयावर अनेकांचे शुभसंदेश येत असताना अचानक देवळ्याचे रावसाहेब आहेर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. मन दुखी झाले.

रावसाहेबांचा चेहरा डाेळ्यासमाेर लगेच आला. गावात गेलं की काेणत्यावरी गल्लीत नाहीतर रस्त्यावर रावसाहेबांची भेट नक्कीच व्हायची. मळलेलं कपडे, वाढलेली काळी पांढरी दाढी, पायात तुटकी चप्पल, बगलेत एखादं जुनं वर्तमानपत्र व हातात एक काठी अस स्वरुप रावसाहेबांचं हाेतं. वाहनांची कुठं गर्दी झाली तर ती कमी करण्यासाठी रावसाहेब हजर असायचे.

रावसाहेबांचा अवतार जरी मळलेला असायचा पण मन मात्र निर्मळ हाेते. सर्वांना हाेवुन नमस्कार करणार, जेथे हक्काचा माणुस असेल, तेथे दहा रुपये नक्कीच मागणार. कुणी हेटाळल तरी चेह-यावर स्मित हास्य कायम ठेवणार. कुणी रावसाहेबांची चेष्टा करायचे, वेडा म्हणुन संबाेधायचे तरीही समाेरच्याला प्रतिसाद आपल्या हास्यानेच दिला असेल. फाेटाेत जसे रावसाहेब विजयाची खुण करुन दाखवत आहे तसे ते नेहमी इतरांशी बाेलताना-वागताना विजयी भावातच असायचे. म्हणुन काेणी कितीही कुत्सितपणे वागलं तरी ही विजयाची खुणच रावसाहेबांचा मुळ स्वभाव हाेता.

काही वर्षापुर्वीचा एक प्रसंग सहज डाेळ्यासमाेर आला. भाऊबंदकीतील एका घरी निधन झालेल्या आजाेबांच्या सांत्वनासाठी रावसाहेब पायी पायी चालत मळ्यात आले हाेते. माझी लहान मुलगी माझ्या जवळ पाहुन त्यांनी खिशातुन दहा रुपये काढले व देवु केले. रावसाहेबांचे हे आैदार्य पाहुन उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले. जाे व्यक्ती इतरांकडुन दहा दहा रुपये मागताे. सायंकाळच्या जेवणाची ज्याला भ्रांती असते त्यांनी हे आैदार्य दाखवणे म्हणजे अकल्पितच हाेते. खरंतर देण्याच आैदार्य हे कधीच खिशातील वजनावर नसत तर ते मनाच्या माेठेपणाच्या वजनावर असते.

रावसाहेबांची गावात काही जण, तरुण पाेरं काही वेळेस टिंगलटवाळी करत. ‘येडा रावश्या’ या नावाने हसायचं. रावसाहेबांची अशी अवस्था कशी झाली माहित नाही; पण रावसाहेबांसारख्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजच्या काही शिकलेल्या पण सुसंस्कृत नसलेल्या लाेकांकडे नाही हे स्पष्ट आहे.

रावसाहेब गरीब, निराधार हाेते. दारुचं व्यसन त्यांना लागले हाेते पण माणुस म्हणुन दिलदार हाेते. शहरात व परीसरात काेणताही कार्यक्रम असाे ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणजे रावसाहेबांची उपस्थिती खास असायची.

आता देवळा शहरातील गल्लीत, रस्त्यावर काठी आदळत चालणारा, सर्वांना हाेवुन नमस्कार करणारा, सतत हसतमुख चेहरा घेवुन वावरणारा रावसाहेब दिसणार नाहीत. शहाण्यांच्या गर्दीतला एक वेडा माणुस हरवला म्हणुन फार काेणास विशेष दुख हाेणार नाही. पण रावसाहेबांसारख्या व्यक्तींना गरज असते ती मानसिक उपचारांची, सहानुभूतीची, प्रेम व आपुलकीची हे ज्या दिवशी आपल्या सारख्यांना समजेल त्या दिवशी आपण ‘शहाणे’ झालाे असे समजुया.

कै. रावसाहेबांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवाे ही प्रार्थना करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताे !

शब्दांकन
श्री. भगवान निंबा आहेर
देवळा (9890217361)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!