पूर्वाश्रमीचे भाजप केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा विरोधकांचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार

0
3

द पॉईंट नाऊ ब्युरो : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपतो आहे. आणि आता पुढच्या राष्ट्रपती पदासाठी भाजपने द्रौपदी मुर्मु यांचे नाव निश्चित केले आहे. तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांचे नाव निश्चित केले आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रपती पद उमेदवार नावांची खलबते आता थांबली आहेत. आता विरोधी पक्ष आणि भाजप दोघांनीही आपले उमेदवार निश्चित केले आहेत. नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी येत्या जुलै महिन्यात निवडणूक होत आहे. यासाठी भाजप आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या नावांची चाचपणी झाली. विरोधी पक्षांकडून तर फारुख अब्दुल्ला, शरद पवार, गोपालकृष्ण गांधी, सुशीलकुमार शिंदे अशी नावे पुढे आली. मात्र आता अखेर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांचे नाव निश्चित केले आहे.

कोण आहेत यशवंत सिन्हा?

यशवंत सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील पूर्व IAS अधिकारी आहेत. ज्यांनी दोन दशकांहून अधिक काळ IAS अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आणि त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले.

यशवंत सिन्हा यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला तो जनता पक्षापासून. 1986 मध्ये ते पक्षाचे महासचिव बनले आणि 1988 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत खासदार बनले. त्यांनी चंद्रशेखर यांच्या सरकार मध्ये अर्थमंत्रीपद देखील भूषवले.

आज यशवंत सिन्हा ज्या भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. त्याच भाजपमध्ये ते 1996 साली राष्ट्रीय प्रवक्ता बनले. 1998 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री बनले. यशवंत सिन्हा हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय समजले जात असत. त्यांनी वाजपेयी सरकार मध्ये अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री पद देखील भूषवले. पुढे 2009 मध्ये सिन्हा यांनी भाजपच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि पुढे 2018 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

यशवंत सिन्हा सध्या कोणत्या पदावर आहेत?

यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिल्यावर राजकारणातुन संन्यास घेतल्याची घोषणा केली होती. मात्र 2021 मध्ये तृणमूल काँग्रेस या पक्षात त्यांनी प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्यसभेचे खासदार बनवले.

आता यशवंत सिन्हा यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी ममता बॅनर्जी यांनी पुढे केल्यानंतर विरोधी गटातील जवळपास 17 पक्षांनी या नावास सहमती दर्शवली आहे.

आता पुढचे राष्ट्रपती कोण? भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु की विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा हे पुढील महिन्यातच स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here