नाशिक : आज दिवसभरात शहरासह जिल्ह्यात तीन आगीच्या घटनांनी नाशिक हदारलेले असताना जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे एका धावत्या ट्रकने पेट घेतल्याची आणखीन एक घटना घडली. या घटनेमुळे जिल्ह्यात आज अग्नितांडवाचा दिवस ठरला.
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या या धावत्या मालवाहू ट्रकने संध्याकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला होता. दरम्यान, ट्रकने पेट घेतल्याचे लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली होती. ही घटना टोल नाक्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी वेळीच दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मात्र मोठी गर्दी झाली होती. या घटनेचा व्हिडियो समोर आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आजचा दिवस अग्नितांडवाचा ठरला असून दिवसभरात जिल्ह्यातील विविध ठिकाणी बस व ट्रकच्या दुर्घटना घडल्यात. सकाळी पहाटेच्या सुमारास बस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना, तर दुपारी बारा वाजेच्या सुमारास सप्तश्रृंगी गडावर एसटी बसला शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आगीची घटना घडली. तर दुसरीकडे मनमाडमधील अपघातात गॅसचे सिलेंडर हवेत उडून झालेले स्फोट, तर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत मार्केटसमोर ट्रकला भीषण आग लागल्याची चौथी घटना आज जिल्ह्यामध्ये घडली आहे.
ह्या सर्व दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहेत. एकूणच आजचा दिवस नाशिक जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरला गेला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम